हा अत्यंत काळजीपूर्वक हाताळण्याचा विषय असल्याने श्रद्धेचा किंवा बुद्धीप्रामाण्याचा अतिरेक केल्याने कठिण प्रसंग उभे राहू शकतात. व्यक्तीच्या जाण्याने आधिच मागे राहिलेले दुःखी असतात. त्यात नास्तिकतेची तलवार चालवून त्यांना अधिक घायाळ करणे बरेचदा अयोग्य ठरते.
माझा असा अनुभव आहे, की हे सर्व विधी आप्तांना त्या व्यक्तिच्या जाण्याच्या दुःखातून/धक्क्यातून बाहेर येण्यास मदत करतात.
तेरा दिवसातील ते विधी, आणि शेवट काहीतरी गोड करण्याची पद्धत : जाणारे जातात, जगरहाटी चालूच राहते, असे त्या विधिंमधून जाणवत राहते. मृताचे कुटुंबीय त्या दुःखातून हळू हळू जगरहाटीचा भाग बनत जातात या विधींमुळे. अश्या विधींमध्ये प्रसंगी येणार्या अडचणींमुळे (निताताईंनी गुरुजी गायब होण्याचा प्रसंग दिला आहे), कदाचीत मूळ दुःख हलके होत असेल. याच्याच जोडीला मृतव्याक्तीसाठीचे आपले कर्तव्य आपण पार पाडत आहोत असे समाधानही (खरे/खोटे) मिळत असते.
आता या सर्व गोष्टी (म्हणजे दुःखातून बाहेर येण्यास मदत, आणि कर्तव्यपूर्ती चे समाधान) कुणास दुसरे काही करून (म्हणजे दुसर्या दिवशी कामावर जायला लागणे/ कुणाला तरी मृत व्यक्तींच्या नावाने मदत करणे) मिळत असतील, तर हे विधी न केल्याने काही बिघडत नाही. पण हा ज्याचा त्याचा विषय आहे, आणि तो ज्याने त्याने आपल्या परीने हाताळावा, आणि दुसर्यास हाताळू द्यावा.