उशीरा वाचनात आले म्हणून प्रतिसादास उशीर झाला आहे. सत्यनारायणपूजेविषयी वाचलेली आणि थोडीफार आठवत असलेली माहिती अशी : एकोणीसाव्या शतकातील एक कर्तबगार व्यक्ती (बहुतेक रावसाहेब वि. ना. मंडलिक असावेत) आपली दैनंदिनी लिहीत असत. त्यामध्ये एक दिवस ते सत्यनारायणाच्या पूजेला आमंत्रणावरून कसे गेले होते त्याचे वर्णन आहे. त्यात अशा अर्थाचे म्हटले आहे की ही पूजा अलीकडे फार बोकाळली आहे. ही बंगाल्यातून आपल्यायेथे आली.ब्राह्म(ह्मो)समाजवाद्यांनी वेदोक्त मंत्रांनी होणाऱ्या सर्व पूजा अर्चा वर्ज्य ठरवून सर्व चतुर्वर्णीयांना शक्य अशा नवीन पूजा प्रचलित केल्या, त्यातली ही सत्यनारायण पूजा. हिची पोथी मूळ बंगालीत असे, तिचे मराठीत भाषांतर केले गेले. सोपी, सर्वशक्य अशी ही पूजा सकाळी, दुपारी केव्हाही करता येते. प्रसादाचेही अवडंबर नाही, गव्हाच्या रव्याचा सांजा फक्त. सोवळे-ओवळे नाही, होम हवन नाही. इ.
दैवदुर्विलास असा की एकेकाळी साधीसोपी मानली गेलेली पूजा आज सार्वजनिक रूपात मोठे प्रस्थ होऊन राहिली आहे. वर्गण्या, मोठी आरास, ध्वनिवर्धक इत्यादींचा बडेजाव माजला आहे.