अर्थातच.  वधू->वहू->बहू.   संस्कृतमध्ये सुनेला स्‍नुषा किंवा वधू/पुत्रवधू म्हणतात. सुनेसाठी जनी, जनिका किंवा जनिः हेही शब्द आहेत. पण त्या शब्दांचे अर्थ आई, पत्‍नी किंवा वेणीफ़णी करणारी दासी असेही होतात, म्हणून ते मराठीत आले नसावेत. जनाबाई ऊर्फ‌ नामयाची जनी आपल्या परिचयाची आहे.
समाः स्नुषाजनीवध्वः च चिरण्टी तु सुवासिनी । --अमरकोष(२.६.९)
या पुत्रवधूचा थोडक्यात उल्लेख करायचा म्हणून हिंदीत सुनेलादेखील बहू म्हणत असावेत. याच अर्थी,  पतोह आणि पतोहू(=पुत्राची वहू) हेही शब्द हिंदीत वाचायला मिळतात.
मराठीत मेव्हण्याच्या बायकोला शब्द नाही; हिंदीतही नसावा असे वर म्हटले होते.  पण  एखाद्या नात्याला हिंदीत शब्द नाही असे सहसा होत नाही. मेव्हण्याचा पत्‍नीला सरहज किंवा सलहज म्हणतात असे समजले. (गुजराथीत साळेली.)
भावाच्या बायकोला भौज, भौजाई किंवा भाभी. हाका मारताना नुसतेच भाभी.  आत्याला बुआ, फुफी, फूफी, फुफू, किंवा फूफू. हाका मारताना बुआ. तसेच जीजा(बहनोई), मौसा आणि फूफा यांच्या बाबतीत.  हाका मारताना अनुक्रमे जीजाजी, मौसाजी आणि  फूफाजी. 
चुलत-, मावस-, आते- या नात्यांना हिंदीत अनुक्रमे चचेरा-, ममेरा-, आणि फुफेरा म्हणतात, मराठीतही तसले शब्द आहेतच.
संस्कृतमधून आलेल्या जामातृला हिंदीत जामात, जामाता, जमेई  किंवा दामाद हे शब्द वापरतात.  ज़ावयाच्या भावाला मराठीत (बहुधा थट्टेने वापरायचा) पाणजावई असा शब्द आहे, हिंदीत त्या अर्थाचा शब्द आहे की नाही ते माहीत नाही.  मराठीतली धाकटी ज़ाऊ आणि थोरल्या ज़ाऊबाई हिंदीत देवरानी-जेठानी होतात, व  त्यांचे नवरे देवर आणि जेठ.
राजस्थानी हिंदीत समधी(व्याही) आणि समधन(विहीण) हे शब्द हाका मारताना अनुक्रमे समधीसा आणि समधनसा होतात.  बहुतेक आदरार्थी 'जीं'चे मारवाडी लोक 'सा' म्हणजे साहेब करतात.
मराठीतली सवाष्ण/सुवाशीण/सुवासिनी/सौभाग्यवती हिंदीत सुहागन/सुहागिन होते. पण ज्या सुवासिनी(=स्ववासिनी)या संस्कृत शब्दावरून हे शब्द आपल्या भाषांत आले त्या सुवासिनीचा संस्कृतमध्ये ' तरुण विवाहिता' असा मूळ अर्थ आहे.   चिरण्टी, चिरिण्टी, चरण्टी, किंवा चरिण्टी म्हणजे खूप दिवस माहेरी राहणारी माहेरवाशीण.
पणज़ा या अर्थाचे 'परनाना-परदादा' हिंदीत आहेत, पण त्या भाषेत खापरपणज्यांना काय म्हणतात कोण ज़ा‌णे!--अद्वैतुल्लाखान