तुम्ही काय करू शकाल हे तुमच्या वयापेक्षा उत्साहावर अवलंबून असतं. जीवनात तुम्ही किती रस घेता यावरून तुम्हाला किती उत्साह राहणार ते ठरतं. तुम्ही चुकीच्या कल्पना किंवा निरस प्रकल्प हाती घेतले तर साधारण लग्नानंतर जीवन फक्त 'भविष्याची सोय करणे' या कामी लागून निव्वळ पुनरावृत्ती होत राहते. जीवनात बहुआयामी न होता येण्याचं एकमेव कारण म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आनंदा ऐवजी पैश्याशी संबंध जोडण्याची सवय त्यामुळे कोणतीही गोष्ट शिकायला लागणारी चिकाटी राहू शकत नाही.

दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदम सर्वोच्य माणसाशी स्वतःची तुलना. यातून वैषम्या शिवाय काहीही साधत नाही. सर्व प्रथम तुम्ही काय करता ते तुम्हाला आवडले पाहिजे. मी अनेक लोक बघीतले आहेत (खेळात आणि कलेत) जे स्वतःचा विकास कसा होईल या ऐवजी अमका किती ग्रेट आहे तमका काय भारी आहे यावर नुसती चर्चा करण्यात वेळ घालवतात. यातून काहीही साधत नाही! तुमची प्रगती ही तुमची लगन आणि मेहेनत ठरवते, चर्चा आणि तुलना नाही.

जीवनाची आणखी एक मजा आहे, तुम्ही कितीही लांबचा पल्ला गाठायचा ठरवला तरी तुमच्या हातात रोज फक्त एकच दिवस असतो तो म्हणजे आजचा त्यामुळे जो पर्यंत तुम्ही रोज तुम्हाला आवडणारी गोष्ट करत नाही  तो पर्यंत आयुष्यात काहीही बदल होत नाही. असे अनेक आज मिळून तुम्ही काही तरी बदल घडवू शकता आणि जीवनात मजा येऊ शकते.

तुम्ही आता सगळं संपलं असं ज्या दिवशी म्हणता तेंव्हा सगळं थांबतं मग तुमचं वय कितीही असो!

संजय