"दूग़" हा शब्द "दूध" शब्दाशी जवळचा वाटतो.
"दूग़"बद्दलच्या आधी दिलेल्या विकीदुव्यावरील माहितीप्रमाणे "दूग़"चा शब्दशः अर्थ "दूध काढण्याच्या (= दोहनाच्या) क्रियेतून निघालेले" असा असल्याचे कळते. (मूळ धातू दुशिदन = दूध काढणे. ही माहिती इंग्रजी विकीपीडियावरून साभार. )
यावरून "दूग़" हा शब्द "दूध" या शब्दाशी केवळ ध्वनिसाधर्म्यानेच नव्हे, तर अर्थसाधर्म्यानेही खूप जवळचा वाटतो, असे म्हणता येईल.
संस्कृतमध्ये मोहित म्हणजे मुग्ध तसेच दोहित/दुहित (दोहन क्रियेचे फलित)
म्हणजे दुग्ध असावे की काय?
यामागील (क. भू. धा. वि. च्या रूपांपैकी 'इत'प्रत्ययान्त वगळता इतर रूपांच्या रचनेमागील) नेमका नियम संस्कृततज्ज्ञच सांगू शकतील, परंतु असे असण्याची शक्यता खूपच दाट आणि पटण्यासारखी वाटते. 'दह्' (= 'जळणे' की 'जाळणे'? ) पासून 'दग्ध' हे आणखी एक उदाहरण.
टीप: 'दूग़', 'दुख़्तर' या शब्दांमधील 'ग़', 'ख़' हे नुक्ताधारी आहेत, याची कृपया नोंद घ्यावी. याचाच अर्थ, या ध्वनींचा उच्चार थोडासा घशातून / घसा खरवडून येणारा (आणि महाप्राणाच्या थोडा जवळ जाणारा) आहे. यातून त्यांचे दोहनातील किंवा दुहितेतील (यामागील मूळ धातू कोणता? दुह्? ) महाप्राणाशी आणि त्याचवेळी 'डॉटर' या शब्दातील (किंवा ज्यातून 'डॉटर'ची व्युत्पत्ती झाली असावी अशा एखाद्या मूळ शब्दातील) आज अनुच्चारित असलेल्या 'जी-एच्'शी साधर्म्य आणि संभाव्य नाते अधोरेखित व्हावे असे वाटते. (चूभूद्याघ्या.)