ध्वनियोजना मराठीतील रचनेकरिता अनुरूप वाटत नाही. वाचताना डोळ्यांना आणि म्हणताना / म्हटलेली ऐकताना कानांना जबरदस्त खटकते. इतकी खटकते की सर्व लक्ष त्यावरच केंद्रित होऊन अर्थापासून जवळजवळ संपूर्णपणे विचलित होते.
- रदीफ़ातल्या तसेच इतरत्रही (उदा. काही पंक्तींच्या मध्ये येणाऱ्या 'मजल', उकल' यांसारख्या शब्दांच्या शेवटी) येणाऱ्या 'अल्'वर द्यावा लागणारा अतिरिक्त आघात आणि अतिलघु उपान्त्यस्वर
- 'गाठ तळ, गाठ तळ' मधील दोन्ही 'अळ्'वर द्यावा लागणारा अतिरिक्त आघात आणि
अतिलघु उपान्त्यस्वर
- मक्त्यातल्या 'बेफिकिर'मधील 'इर्'वर द्यावा लागणारा अतिरिक्त आघात आणि
अतिलघु उपान्त्यस्वर
या ध्वनियोजना मराठीकरिता अनैसर्गिक, मराठी कानांना मराठी ऐकताना खटकणाऱ्या वाटतात. तसेच,
- 'पापण्यांच्यामधे एक पडदा तरल' या पंक्तीतील 'पडद्या'मधील 'ड'ला जोडून येणारा अतिअतिलघु, जवळपास नगण्य स्वर
- 'गाठ तळ, गाठ तळ' या शब्दयोजनेतील 'गाठ' मधील 'ठ' आणि 'तळ'मधील 'त' यांच्यामध्ये सापडलेला अतिलघु स्वर (असे दोनदा)
या ध्वनियोजना मराठीतील रचनेत एरवी चालून जाण्यासारख्या असल्या तरी वरील विशिष्ट अनैसर्गिक ध्वनियोजनांच्या निकटसान्निध्यात आल्याने कानाला विचित्र वाटू लागतात.
एकंदरीत ही रचना कानाला स्व. मोहंमद रफ़ी यांनी गायलेल्या कोणत्याही (पण विशेषतः मराठीतील) रचनेसारखी लागते. मराठीतील रचना असल्यामुळे कानांना वाईट खटकते, परंतु असाच प्रकार जर हिंदीत किंवा उर्दूत केला असता (म्हणजे रचना हिंदीत किंवा उर्दूत असती आणि तेथे अशीच ध्वनियोजना केली असती) तर सहज खपून गेला असता आणि कोणालाही काहीही वेगळे किंवा विचित्र वाटले नसते, कारण अशी ध्वनिरचना त्या संदर्भात (म्हणजे हिंदीकरिता किंवा उर्दूकरिता) नैसर्गिक असती. ('बॉबी' या चित्रपटात 'मैं शायर तो नहीं' असे एक गाणे आहे. त्यातील ध्रुपद सोडून दिल्यास इतर कडवी ही प्रस्तुत रचनेच्या वृत्तात आहेत. पैकी 'प्यार का नाम मैं ने सुना था मगर, प्यार क्या है यह मुझ को नहीं थी खबर' या दोन ओळी घ्याव्यात. त्या चालीत - आणि 'मगर', 'खबर' या शब्दांतील अंत्य 'र'काराच्या 'ल'काराकडे झुकणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण उच्चारासह - म्हणाव्यात. त्यानंतर प्रस्तुत रचनेतील मतल्याच्या दोन पंक्ती त्याच चालीत म्हणाव्यात. कानांनी तुलना करावी. मला जो मुद्दा मांडायचा आहे तो बहुधा लक्षात यावा.)
तर अशा रीतीने, चमत्कृतिपूर्ण आणि अतिरेकी लक्षवेधक अशा ध्वनियोजनेकडेच संपूर्ण ध्यान (म्हणजे मी नव्हे. माझे ध्यान.) आकर्षित झाल्याने आशयाकडे फारसे लक्ष गेले नाही. नेमक्या याच कारणाकरिता (म्हणजे नेमकी हीच ध्वनियोजना वापरल्यामुळे) या रचनेपेक्षा या रचनेची (दोन्ही) विडंबने अधिक (आणि बेहद्द) आवडली. (किंबहुना या रचनेच्या आशयाकडे - आणि पर्यायाने या रचनेच्या गाभ्याकडे - लक्षही दिले न गेल्याने, ही रचना 'आवडली' असे प्रामाणिकपणे म्हणता येणार नाही.)
अवांतर:
- 'छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए, यह मुनासिब नहीं आदमी के लिए' या हिंदी चित्रपटगीताची चाल प्रस्तुत रचनेस फिट्ट बसावी, एवढेच नव्हे, तर शोभून दिसावी.
- मात्र, 'आप यूँ ही अगर हम से मिलते रहे, देखिए एक दिन प्यार हो जाएगा' या चित्रपटगीताच्या (कडव्यांसहित) चालीवर प्रस्तुत रचना अथपासून इतिपर्यंत (म्हणजे मतल्यापासून मक्त्यापर्यंत) म्हणून पाहिल्यास बहार यावी. (कदाचित रचनेपासून लक्ष पूर्णपणे विचलित होऊन रचना विसरण्यासही मदत व्हावी. हास्यासारखे वेदनाशामक आणि विसरायला लावणारे दुसरे औषध नाही! पूर्वीच्या काळी दात उपटताना भूल देण्यासाठी दंतवैद्य हास्यवायू - लाफ़िंग गॅस, अर्थात नैट्रस ऑक्साईड - वापरत म्हणतात, ते उगीच नसावे.)
- चमत्कृतिपूर्ण ध्वनियोजनेकडे लक्ष पूर्णपणे वेधले गेल्याने रचनेकडे जरी जवळपास संपूर्ण दुर्लक्ष झाले, तरी रचना वरवर डोळ्यांखालून जात असताना पाचवी द्विपदी नजरेस पडली, आणि काही भलभलती चित्रे डोळ्यांसमोर तरळून गेली.
असो. एकंदरीत रचनेमुळे दोन घटका चांगल्या जाण्यास मदत झाली. छान विरंगुळा झाला. पुढील लेखनाकरिता जनरीतीप्रमाणे आणि मनापासून शुभेच्छा.