आप अगर आप ना होते..(येथे ऐका)

गृहप्रवेश चित्रपटातलं एक वेगळंच गाणं. सुलक्षणा पंडितने गायलेलं..

सुलक्षणा पंडित.. सुंदर दिसायची. परंतु गायचीही तेवढीच सुरेख..

तिने गायलेलं हे गाणं गायकीच्या दृष्टीने पाहायला गेल्यास तसं बर्‍यापैकी कठीण गाणं. अभिजात गायकीची उत्तम बैठक हवी या गाण्याला.. आणि म्हणूनच सुलक्षणा पंडितचं विशेष कौतुक वाटतं! तिनं हे गाणं अगदी सहज पेललं आहे..उत्तम मांडलं आहे..!

'तो भला क्या होते..' ओळीतला शब्द टाकण्याचा अंदाज, 'लोग केहेते है..' मधला सहजसुंदर तार षड्ज, 'संग-ए-मरमर..' या अंतर्‍यात पुन्हा लागलेला अतिशय सुरेख तार षड्ज, स्वच्छ-निकोप आकार, सां..धपग, गमपनीसांनीधनीसां...' ही पटदीप रागाचा रंग असलेली दाणेदार तान, सुंदर आवाज, गाण्यातले भाव! अनेक चांगल्या गोष्टी होत्या सुलक्षणा पंडितच्या गाण्यात!

बासू भट्टाचार्यांचा स्त्री-पुरुष संबंधांवरचा हा चित्रपटही छान होता..हरिभाईच्या हापिसासतली उफाड्याची-गोरीपान सारिका, तिच्यावर लट्टू होणारा हरिभाई, त्याची सुरेख परंतु तेवढीच साधी-घरगुती पत्नी शर्मिला.. या सार्‍यांचीच कामे छान झाली होती..

हरिभाई ऊर्फ संजीवकुमार. प्रत्यक्ष आयुष्यात ह्या उत्तुंग अभिनेत्याने सुलक्षणा पंडितच्या प्रपोजलला होकार दिला असता तर जोडा खरंच छान दिसला असता! Smile
असो..

--तात्या अभ्यंकर.