बेफिकीर, विनायक आणि टग्या यांचे मनापासून अभिनंदन के त्यांनी अत्यंत सुंदर चर्चा घडवून आणली. (गालिब चा विषय असल्यामुळे उर्दू ढंगाचा 'के' चा वापर क्षम्य ठरावा!)मनोगतातल्या उत्खननात अशी सखोल आणि ज्ञानगर्भ, ज्ञानरम्य चर्चा आढळली नव्हती. सर्वांचे सर्व मुद्दे पटले असे नसले तरी कशाचाही प्रतिवाद करावासा वाटत नाही कारण प्रत्येकाने आपले मुद्दे विरोधीमताचा आदर करीत, निर्विषपणे, तयारीने आणि अभ्यासपूर्वक मांडले आहेत. एक बौद्धिक मेजवानीच अनुभवायला मि
ळाली. ही उच्च पातळी मनोगतावरील इतर चर्चांतही कायम राहो. (राहिली असती तर किती बरे झाले असते!)
कलावंताच्या कृतीचे देशकालसापेक्ष मूल्यमापन केल्याने आस्वादात कदाचित भर पडत असेल किंवा त्याची खुमारी वाढत असेल, पण चिरंतन साहित्य किंवा कलाकृती ही देशकालातीत असते हेही खरे आहे. गालिब च्या कलाकृती शाश्वत गणल्या जातील किंवा कसे हे काळच ठरवेल. सद्ध्यातरी गालिब ची लोकप्रियता उदंड आहे .
एकराळ इति ही कल्पना मंत्रांमधे असली तरी प्रत्यक्षात नव्हती. छोटी छोटी राज्ये, त्यांचे आपापसातले वैर, सततच्या लढाया, प्रत्येकाचे वेगवेगळे चलन(नाणी), अशा अनेक गोष्टींमुळे एकवाक्यता, एकसूत्रता असणे कठिणच होते. युरोपात विद्येचे पुनरुज्जीवन झाले तसे भारतवर्षात झाले नाही. त्यामुळे मध्ययुगात 'राष्ट्र' ही संकल्पना वाढीस लागली नाही.
चर्चेत बहुतेक मुद्दे येऊन गेले आहेत त्यामुळे अधिक लिहावे असे काही उरलेले नाही. मनोगतास व मनोगतींस धन्यवाद.