उत्तम व्यक्तिचित्रण. आमच्या नागपूरचा लसूबा आठवला. लसूबा सुदानी ख्रिस्ती. सुदानी ख्रिस्ती साधारणपणे मुस्लिम सुदान्यांच्या तुलनेत काळे असतात. लसूबा काळाभोर, उंच व शिडशिडीत. पण त्याचे सौंदर्य डोळ्यांत होते. काय टपोरे व पाणीदार डोळे होते त्याचे!
लसूबा नागपुरात म्हणायला कायद्याचे शिक्षण घ्यायला आला होता. पण त्याला पास होण्यात रसच नव्हता. लसूबाला 'इंटरनॅशनल रेफ्युजी स्टेटस' होते. बऱ्यापैकी भत्ताबित्ता मिळत होता. त्यामुळे लसूबाचे एकंदर छान चालले असावे असा निष्कर्ष आम्ही तेव्हा काढला होता.
तो बऱ्यापैकी हिंदी, मराठी बोलायचा. विधी महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या आवारात कधी कुठल्याशा चहाच्या टपरीवर, तर कधी कडुनिंबाच्या पारावर लसूबा विड्या फुंकत, चहा पीत बसलेला असायचा. बहुधा एकटाच. त्यावेळी त्याच्या मंदस्मितांकित चेहऱ्यावर एखाद्या योगी पुरुषासारखेच अलौकिक तेज विलसत असे. त्यावेळी तर तो विदर्भातल्या एका महाराजांचा सुदानी अवतारच वाटायचा. आमचा एक मित्र तर बरेचदा लसूबा पुढे आला की त्या महाराजांच्या निरर्थक मंत्राचा उद्घोष करायचा. लसूबाही वर 'जाम्बो साना' करायचा. अर्थात 'जाम्बो साना' हा कुठल्याही आफ्रिकन महाराजांचा मंत्र नाही. आणि निरर्थकही नाही.
तर ह्या 'काळ्याला' मराठीऱ्हिंदी कळत नसेलच असे गृहीत धरून वेळोवेळी काही हुशार लोक त्याच्यासमोरच काहीबाही बकत असत. आणि मग लसूबा जेव्हा त्यांना त्यांच्या भाषेतून उत्तर देई तेव्हा त्यांच्या चेहऱ्यांचा रंग चक्क उडताना दिसत असे. असो.
तर ह्या आमच्या लसुबाने पुढे जाऊन नागपुरातल्याच एका मुलीशी लग्न केले. मुलीचा भाऊ एक अतिशय चिल्लर गुंड. तीन-चार वर्षांपूर्वी नागपूरला गेलो होतो तेव्हा चौकातल्या गप्पांत लसूबाची ख्यालीखुशाली कळली. आमच्या गप्पा चालू असतानाच नेमका लसूबाचा साळाही तिथे टपकला. "काल्या, कैसे है रे तेरे जिजाजी, " असे एका मित्राने मला डोळा मारत विचारले. "अरे, एकदम मजेमें. टकाटक. बहन बतला रही थी क्यानडात सौपट हड्डीफोड ठंड. बम बरफ. पन चांगल मोठं मकान भेटलं त्यांना. मम्मी माह्या भाच्यासाटी २-३ स्वेटर विनून राह्यली आए. " फार बरे वाटले.
जाता-जाता
एक अरेबियन देशात
इराणी, आफ्रिकन, अरेबिक, ऑस्ट्रेलियन, भारतीय लोकांची आमच्या वर्गात खिचडी
होती नुसती!
तुम्हाला बहुधा अरब म्हणायचे असावे. कॉफी, लिपी 'अरेबिक' आणि रात्री बहुधा 'अरेबियन' असतात. अरबस्तानातल्या माणसांना मात्र अरबच म्हणतात आणि देशही बहुधा अरबच असतात, असे वाटते. चूभूद्याघ्या.