शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर पुष्कळ चर्वितचर्वण  झाले आहे. कित्येकदा तर मूळ विषयाचे गांभीर्य दडपून टाकून, केवळ सरकारवर तोफा डागण्यासाठी हा विषय 'हायजॅक' केला गेला आहे.मुंबईतल्या किंवा कुठल्याही झोपडपट्टीमधले, उकिरड्यातले अन्न वेचून खाणारे, रेल्वे रुळांवर शौचास जावे लागत असलेले, दिवसोंदिवस आंघोळ करू न शकणारे लोक आत्महत्या का करीत नाहीत? त्यांच्यामध्ये जगण्याची कोणती प्रेरणा असते? किंवा, उलटपक्षी, कॅट सारख्या परीक्षांतील अथवा कुठल्याही परीक्षेतील अपयशाला घाबरणारे, आय. आय. टी सारख्या नामवंत शिक्षणसंस्थांतून शिकणारे लोक आत्महत्या का करतात? त्यांच्यामध्ये कोणती प्रेरणा कमी पडते? महत्त्वाच्या परीक्षांच्या निकालांच्या आगेमागे आत्महत्यांची लाट का येते?  रोज रात्री नवऱ्याच्या लाथाबुक्क्यांचा मार खाऊन, प्रसंगी डाग, चटके सोसून पुन्हा सकाळी निमूटपणे सर्व अपमान व सर्वांसमोर झालेली शोभा विसरून(सूडाची भावना न ठेवता) त्याच्यासाठी स्वयंपाक बनवणारी स्त्री कोणत्या अंतःप्रेरणेने जगत असते? त्यातल्या काही आत्महत्या करतातही, पण एकंदर अत्याचाराच्या प्रमाणात त्या नगण्य असतात.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा देशातल्या एकूण आत्महत्यांमधला एक छोटा भाग आहे. त्यातूनही, सर्वच कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतात का? जर ह्याचे उत्तर 'नाही' असे असेल, तर आत्महत्यांमागे मनोदुर्बलता हे कारण असण्याची शक्यता वाढते.

पुनरुक्तीचा आरोप सोसूनही असे सांगावेसे वाटते की मानसिक आजार हे  आपल्याकडे खूपच दुर्लक्षित व उपेक्षित राहिलेले आहेत. 'आपल्याच नशिबी हा छळवाद का?' ह्या प्रश्नांचे उत्तर शोधताना कोमल, दुर्बळ, अपरिपक्व मनांची ससेहोलपट होते. अध्यात्माने 'पूर्वसंचित', 'गेल्या जन्मीचे पाप' ह्या संकल्पनांद्वारे थोडेफार समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे, पण ह्या प्रयत्नांना भरीव वैज्ञानिक पाया नसल्याने ते सर्वत्र सारख्याच तीव्रतेने (इंटेंसिटी) राबविता येऊ शकत नाहीत. सक्षमीकरणाची ही प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी आहे. उपाय हा चमत्कार किंवा जादू नसतो. 'पी हळद आणि हो गोरी' असे काही नसते. शिवाय, क्रांतीपेक्षा उत्क्रांती ही हळूहळू पण सहज,कोणत्याही उलथापालथीशिवाय घडून येणारी असते आणि म्हणूनच अधिक टिकाऊ असते.