हा नक्कीच चिंतेचा विषय आहे. मला असे वाटते की, शेतकरी असे कृत्य करतात, ते केवळ मनोदुर्बलतेतून नव्हे तर विफलतेच्या परिसीमेतून. त्यांना जे कर्ज मिळते, ते एक तर मंजूर पूर्ण रकमेचे नसते (मध्ये पाणी मुरते) आणि दुसरे म्हणजे त्यासाठी त्यांना त्यांची जमीन गहाण ठेवावी लागते. कर्ज न फेडता आल्यामुळे पिढीजात जमीनीवर पाणी सोडायची पाळी जेव्हा येते, तेव्हाच्या वेदना साहजिकच असह्य होणाऱ्या असतात. कर्ज देणे व आर्थिक मदत करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडून हिसकावल्या जाणार नाहीत, याची व्यवस्था झाली तर आत्महत्या व्हायचे कारण राहाणार नाही असे वाटते. मुळात नडल्या शेतकऱ्यांच्या जमिनी या ना त्या प्रकारे हडप करण्यासाठीचे उद्योग थांबविले पाहिजे. दुसरे म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रामाणिक सहकारी शेतीचा प्रयोग राबवावा. या पद्धतीत कर्ज एकावर न राहाता संघावर राहील आणि ते कर्ज फेडण्यासाठी सांघिक प्रयत्नही होतील.