येथे आनंदवनाची भलामण करण्याचाही हेतू नाही किंवा त्यांना नाहक वादात ओढण्याचाही नाही. पण आज त्यांच्या विद्यमाने (त्यांच्या उपस्थितीत, त्यांच्या देखरेखीखाली) झरी आणि मूळगवाणे या गावी ग्रामसंपन्नतेचे आणि स्वावलंबनाचे काही मूलभूत प्रयोग चालू आहेत.या गावात लोकांमध्ये आत्मसन्मान जागवण्याचे विकास आमटे यांचे प्रयत्न तीनचार वर्षांतच फळाला येत आहेत असे सकृतदर्शनी दिसते. पारंपरिकता,किंकर्तव्यविमूढता झडझडून टाकणे, नव्या विचारांना, नव्या ज्ञानाला,बदलांना, बदलत्या निसर्गचक्राला सामोरे जाणे, शेतीवरील अवलंबित्वाची टक्केवारी कमी करणे अशी काही तत्त्वे मार्गदर्शक म्हणून त्यांनी स्वीकारली आहेत. (बव्हंशी त्या गावातूनच श्रमदान, वर्गणी या व तत्सम गोष्टींद्वारे मूलस्रोत-रीसोर्सेस निर्माण करून.)
अगतिक, गतानुगतिक अशा मनस्थितीतून भारतीय समाज जितक्या लवकर बाहेर पडेल तितक्या लवकर गरिबी हटेल, नवनवीन शोध, संकल्पना जन्म घेतील, आपले स्वतःचे असे देशी(इंडीजीनस) विज्ञान, तंत्रज्ञान निर्माण होईल.
हे कोणा एकट्याचे किंवा केवळ सरकारी संस्थांचे काम नाही. ह्या पुनरुत्थानामध्ये आणि विद्येच्या पुनरुज्जीवनामध्ये सर्व समाजाने सामील व्हायला हवे किंवा त्याला सामील करून घ्यायला हवे. हे नवविचारांचे वारे सद्ध्या एका विशिष्ट परिघामध्ये कुंठित झाल्यासारखे दिसतात, पण बारकाईने पाहणाऱ्याला ते तळागाळापर्यंत झिरपतानाही दिसतात. ह्या झिरपाचा किंवा झिरपणीचा प्रवेगही वाढता आहे. लांबलचक आकडेवारीने हे सिद्ध करण्याचे हे स्थळ नव्हे, पण विदर्भ-मराठवाडा-कोंकण इथल्या मागासलेल्या पट्ट्यात स्वयंशिक्षणप्रयोग सारख्या कितीतरी संस्था सक्षमीकरणाचे हे कार्य हळूहळू आणि गाजावाजा न करता करीत आहेत.