आजच्या(३०-३-२०१०) लोकसत्तेत एका शेतकऱ्याचे एक पत्र छापून आले आहे. बीटी बियाणाबाबत असल्याने येथे देत आहे.

प्रेषक :
श्रीराम विष्णू फडके, सोमवार, २९ मार्च २०१०
संपर्क- ९८२२११४३६६
आपल्या शेतीवाडी सदरात डॉ. गिरधर पाटील यांचा बीटी वांगे कापसाच्या वाटेवर’ हा लेख वाचला. आश्चर्य वाटले. कारण शेतकरी यावर प्रतिक्रिया देत नाही हे दुर्दैव.
मी स्वत: शेतकरी व दूध उत्पादक असून बीटी कापूस, सरकी तेल या तिन्हीचा अनुभव घेतला. त्यांचा अनुभव बी. टी. कापूस पीक घेऊनही त्याचे उत्पन्न एकरी ६ ते ८ क्विंटलपेक्षा जास्त येत नाही. बोंड अळीचा प्रादुर्भाव होत नाही हे जरी खरे असले तरी इतर फवारण्यांचा खर्च उदडे, मावा, तुडतुडे लाल्या इ. रोगांवरच फवारण्याचा खर्च जास्त येतो. बी. टी. कापूस पीक घेतलेल्या शेतात इतर दुसरे कुठलेही पीक चांगले येत नाही. मका, ज्वारी, गहू या पिकांची व्यवस्थित वाढ होत नाही आणि रासायनिक खते घालून वाढ मिळाली तरी उत्पन्न वाढत नाही. हे झाले पिकाबाबत.
सरकी पेंड व सरकीचे दुष्परिणाम फारच भयावह आहे. सरकीतील प्रोटीनफॅटचे प्रमाण कमी झाले असून पूर्वी वरलक्ष्मी नांदेड ४४ इतर सुधारित वाणापासून मिळणाऱ्या सरकी व सरकीढेप ३ किलोपर्यंत खाऊ घातल्यात १९९४ सालापर्यंत गाय वा म्हशीपासून दिवसाला १४ ते १६ लिटरपर्यंत दूध मिळत होते व जनावराची प्रकृती व्यवस्थित रहात होती. निसर्ग नियमानुसारचे जनावराचे ऋतुचक्र नियमित होते. परंतु बीटीची सरकी, सरकी टेप, सरकी तेल खायला लागल्या पासून दुधाचे प्रमाण दिवसाला ८ लिटरपर्यंत म्हैस व १२ लिटरपर्यंत गाय इतके घसरले आहे.

शिवाय जनावरांच्या प्रकृतीवर परिणाम होतो. प्रजनन क्षमता कमी होते. जनावरे ५ ते ६ महिन्यांतच गाभडतात. जरी गाभडली नाही तरी जनावरांना त्याचा त्रास होतो व या केसेसमध्ये जनावरे दगावण्याचे प्रमाण ५० टक्के आहे. विताना अंग बाहेर आले. जनावर वाचले तरी जनावर दूध देत नाही. त्यामुळे शेतकरी त्यास कसायास विकून टाकतो. शिवाय ज्या गाई वा म्हशी व्यवस्थित वितात त्यांची पिल्ले अशक्त व दुबळी जन्माला येतात. त्यांची कितीही व्यवस्थित देखभाल केली तरी ती जगत नाही. दूध हे पूर्णान्न मानले जाते. या जनावरांपासून मिळणारे दूध सेवन केल्यानंतर लहान मुले म्हातारी, माणसं स्त्रियांमध्ये याचे दुष्परिणाम दिसतात. हे सर्व भयानक आहे.
पर्यावरणवादी फक्त मीडियापुढे गोंधळ घालतात; पब्लिसिटी स्टंट करतात. पण हे ज्या शेतकऱ्यांसाठी चालले आहे ,त्याचे मत विचारात घेतो कोण?  बी. टी. वांगीसुद्धा प्रायोगिक तत्त्वावर उत्पादन घेऊन त्याचे परिणाम, दुष्परिणाम जाणण्यासाठी ४ ते ५ वर्ष निरीक्षणे नोंदवून मगच त्यावर बंदी घालणे योग्य ठरले असते. कीटकनाशक उद्योजकांचे हित जपण्यास तत्पर असणारे  शासन पहाता मुकी बिचारी कुणी हाका. शेतकरी मात्र या चरकात भरडला जातोय याची खंत कोणाला?