संस्कृतमध्ये मुह् या धातूची कर्म. भू. धा. वि. दोन रूपे होतात, मूढ आणि मुग्ध. मोहित हे प्रयोजक मोहयति चे कर्म. भू. धा. वि. आहे.  दुख्तर चा दुहितेशी संबंध आहेच. आणि दुग्धशीही अन्वयाने आहे. संस्कृतपूर्व अशा एका आदिभाषेमधून (जी आता अर्थातच अस्तंगत आहे,)निघालेल्या अनेक भाषांमध्ये (यात संस्कृत भाषा आलीच) असे समानार्थी आणि ध्वनिसाधर्म्य असलेले शब्द आढळतात. खुष्क आणि शुष्क, मादर, मातर, मातृ,मदर,पाद्री, फादर, पितृ, बिरादरी, (बिऱ्हाड? ) ब्रदर, भ्रातृ, अशा अनेक गंमती आहेत. लिंग्विस्टिक्स, त्यातूनही व्युत्पत्तिशास्त्र  हे खूप मनोरंजक पण क्लिष्ट असे शास्त्र आहे. आपले कित्येक पूर्वग्रह, दुराग्रह या शास्त्राच्या अध्ययनामुळे गळून पडतात. मानव समूहांचा विस्तार व संचार कुठे कुठे कसाकसा होत गेला ते कळते. इतिहासाची मांडणी आजकाल केवळ कागदपत्रांच्या आधाराने होत नाही. त्यासाठी भाषाशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, मानववंशशास्त्र, प्रादेशिक चालीरीती, लोकरीती यांचा आधार घेतला जातो. आपल्या मराठीमध्ये डॉ. कोसंबी यांनी हा दृष्टिकोन प्रथम रुजवला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.