तरून जो जाईल सिंधू महान
असा हा एकच श्री हनुमान..
(येथे ऐका)

बजरंगबलीचं वर्णन, महाराष्ट्र-वाल्मिकी गदिमांचे शब्द, बाबूजींची गायकी, आणि मुलतानी राग! अजून काय पाहिजे?

भजनी ठेक्यातलं, गीत रामायणातलं एक जबरदस्त जमलेलं गाणं.. अगदी शब्दश: जबरदस्त!

अंजनिचा हा बलाढ्य आत्मज
हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज
निजशक्तीने ताडिल दिग्गज
बलशाली धीमान्‌

या शब्दांचं वर्णन करायला मुलतानीसारखा भारदस्त रागच हवा.. राग मुलतानी! गायकीकरता अत्यंत अवघड. स्वभावाने मस्तीभरा आणि चैनदार.. तितकाच तेजस्वी..अगदी हनुमानाइतकाच!
दुपारी यथास्थित बासुंदी-पुरीचं जेवण, त्यानंतर ताणून झोप आणि पाचच्या सुमारास दोन तंबोर्‍यात जमलेला सुरेल मुलतानी! संपला विषय!

आणि हे गाणं बांधायचं आणि पेलायचं काम केवळ बाबूजीच करू जाणेत. लौकिकार्थाने भावसंगीतात रमलेल्या बाबूजींना रागसंगीताची भक्कम बैठक लाभली होती..आवाजातील खुलेपणा, त्यातील गोडवा, विलक्षण सुरेलता, स्पष्ट शब्दोच्चार, गाण्यातील भाव, स्वरालयीवर अफाट हुकमत, रागदारी संगीतातलं पांडित्य! ही सारी विशेषणं संपतात तरी बाबूजी उरतातच! आभाळाइतका मोठा माणूस..!

-- तात्या अभ्यंकर.