"मुग्ध" या शब्दापेक्षा "मूढ" या शब्दाने थोडी नकारार्थी छटा (विशेषतः मराठी कानांना) अभिप्रेत होते हे जरी खरे असले, तरी नेमका फरक आपण म्हणता तसा नसावा, असे वाटते. फरक (जेथे आहे तेथे) "कशाचा मोह" यात नसून "मोहाचे प्रमाण किंवा दर्जा" यात असावा, अशी शंका येते.

"मूढ" आणि "मुग्ध" हे दोन्ही शब्द आपट्यांच्या संस्कृत शब्दकोशात तपासून पाहिले असता माझी तरी अशी धारणा झाली, की "मूढ" या शब्दातून व्यक्त होणाऱ्या सर्व अर्थच्छटा (ज्या सर्व नकारार्थी किंवा प्रमाणाने अतिरेकी - म्हणजे बोलीभाषेत स्पष्टच सांगायचे झाले तर काहीशा "गॉन केस" स्वरूपाच्या - आहेत) या "मुग्ध" या शब्दातूनही व्यक्त होऊ शकाव्यात, मात्र त्याचबरोबर "मुग्ध" हा शब्द आणखीही काही (नकारार्थी नसलेल्या) अर्थच्छटा व्यक्त करण्यासाठी वापरला जाऊ शकावा. थोडक्यात, "मुग्ध" हा शब्द "मूढ" ऐवजी वापरता यावा, मात्र "मूढ" हा शब्द "मुग्ध"ऐवजी नेहमी वापरता येईलच असे नाही.

तसेही "मूढ" या शब्दाला नकारार्थी, "वाईट" अर्थच्छटा आहे एवढ्या अंशी आपले निरीक्षण पटण्यासारखे वाटते. (व्यवहारातले सोपे उदाहरणद्यायचे झाले तर एखाद्या मुलीचे नाव "मुग्धा" असू शकते*, **, परंतु स्वतःच्या पोटच्या पोरीचे नाव "मूढा" ठेवणारा बाप अजूनपर्यंत जन्माला आलेला असल्यास त्याबद्दल निदान मी तरी ऐकलेले नाही. किंवा, किंकर्तव्यमूढ, दिङ्मूढ या शब्दांना एका प्रकारची नकारार्थी अर्थच्छटा आहे हे निश्चित.) परंतु उलटपक्षी, "मुग्ध" या शब्दाची अर्थच्छटा नेहमी नकारार्थी नसेलच, असे नसावे. (याची उदाहरणे मला माहीत नाहीत.)

 अर्थात, हा केवळ आपट्यांच्या संस्कृत शब्दकोशाच्या मर्यादित दाखल्याच्या आधारावर उभारलेला माझा तर्क आहे. (आंतरजालावर उपलब्धअसलेल्या मॅक्डॉनेलच्या संस्कृत शब्दकोशात पाहूनसुद्धा यासारखीच काही धारणा झाली.) तो चुकीचा असू शकेल किंवा त्यात त्रुटी असू शकतील हे ओघानेच आले. त्यामुळे याबद्दल खात्रीलायक काय ते केवळ संस्कृततज्ज्ञच सांगू शकतील. (चूभूद्याघ्या.)

* या "मुग्धा"चे आडनाव "मोहिते" असल्यास सोन्याहूनही पिवळे.
** अवांतर: मोल्ज़वर्थच्या मराठी शब्दकोशात दिलेला "मुग्धा"चा अर्थ रोचक आहे.