संगणक-जाल-उपलब्धतेपासून दूर असल्यामुळे मनात योजून ठेवलेले उत्तर पाठवता आले नव्हते. ते सर्व आणि अगदी तसेच मुद्दे आपल्या उत्तरात  (खाना-खिलाना-खिलवाना) पाहून आनंद वाटला. अर्थात कोणी ना कोणीतरी शंकासमाधान करीलच ही खात्री मनोगतींबाबत होतीच.

मराठीमध्ये एक प्रयोजक मोठे नामी आहे. पिणे -पाजणे-पाजवणे.

शिवाय मराठीमध्ये नकारार्थी कर्मणी प्रयोगामध्ये एक वेगळा वापर असतो. माझ्याने(माझ्याकडून) दूध प्यायले ज़ाते. माझ्याने दूध पिववत नाही. किंवा, माझ्याच्याने तो चहा पिववेना. तसेच, त्याच्याने (गाणी) ऐकली ज़ातात, त्याच्याने ऐकवेना.

उचलणे हे क्रियापद घेतले तर मला (ते वजन )उचलेना, माझ्या(च्या)ने ते उचलवेना.  तसेच पेलेना, पेलवेना याबाबत म्हणता येईल. क्रियेमध्ये कर्त्याची स्वेच्छा आहे की त्याच्यावर ती क्रिया लादली आहे यावर क्रियापदाचे रूप ठरते. अर्थात हा भेद आता सूक्ष्म होताहोता नामशेष  होण्याच्या मार्गावर आहे.