फार छान श्लोक आहे, कुठे मिळाला?
मला माहीत असलेला राघवदेवविरचित श्लोक किंचित वेगळा आहे. तो असा :-
वनानि दहतो वह्ने: सखा भवति मारुत: ।
स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौहृदम् ॥
आता प्रयोजकांविषयी :
मराठीत काही रूपे प्रयोजकाची आहेत असे वाटते, पण ती प्रयोजके नाहीत. उदा. खुणावणे, रागावणे, वेडावणे, मावणे, सोकावणे, सवकणे, सोपविणे वगैरे.
अनियमित प्रयोजके : भिणे->भेडावणे, भिवविणे, भेवडावणे. लावणे-> लागणे, दिसणे->दाखवणे, येणे->आणणे, जाणे->नेणे इ.
काही प्रयोजक रूपांची मूळ सामान्य रूपे अस्तित्वातच नाहीत. उदा. पाठवणे, बडवणे, कमावणे वगैरे.
लतापुष्पांनी सांगितलेली रूपे नकारार्थीच नव्हेत तर कधीकधी साध्या वाक्यांतही दिसतात. त्याला काम करवते. त्याला जाववते. (कर्ते चतुर्थ्यन्त, प्रयोग अनुक्रमे कर्मणी आणि भावे ). त्याच्याने काम करवत नाही. (कर्त्याची षष्ठी+तृतीया). माझ्याच्याने(षष्ठी+षष्ठी+तृतीया) काम करवत नाही. या रूपांना शक्यत्वार्थी प्रयोजके म्हणायला हरकत नसावी.
कधीकधी प्रयोजक वाटणारे रूप सामान्य असते. चराति चरतो भग: (चालणाऱ्याचे भाग्य चालत राहते. ) येथे चराति हे (वैदिक)रूप चरति ऐवजी आले आहे. कधी प्रयोजक रूप अगदी वेगळ्या अर्थाने येते. वदन=मुख, पण वादन=वाजविणे. तर कधी प्रयोजक रूपाचा अर्थ मूळ अर्थासारखाच असू शकतो उदा. दर्शक=पाहणारा/दाखवणारा. दह् चे असेच झाले आहे. अर्थ जळणे किंवा जाळणे.-अद्वैतुल्लाखान