औरंगाबाद - बीटी वांग्याला पर्याय ठरेल अशा वांग्याचा शोध डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागाने लावला आहे. या नव्या संशोधित वांग्याच्या वाणाचे पेटंटही नोंदवण्यात आले आहे. वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रा.डॉ.अशोक चव्हाण यांनी ही माहिती सोमवारी (ता.२९ मार्च २०१०) पत्रकारांना दिली.

डॉ.अशोक चव्हाण म्हणाले , ही घटना म्हणजे विद्यापीठाच्या दृष्टीने गरूडझेपच ठरावी अशी आहे. डॉ.चव्हाण यांचे संशोधक विद्यार्थी भास्कर ठाकरे यांनी बीटी वांग्याला पर्याय ठरणाऱ्या वांग्यावर संशोधन केले. नागपूर येथील अंकुर सीड्सचे ते कर्मचारी आहेत. या संशोधनात अंकुर सीड्सचा मोठा वाटा असल्याचे डॉ.चव्हाण यांनी सांगितले.वांग्यांना कीड लागते, आळ्या होतात. काही वांग्यांवर काळपट डागही पडतात. हे सर्व वांग्यांवर पडणारे रोग आहेत.या रोगांमुळे बीज उत्पादकांचे व शेतकऱ्यांचे साठ ते पंच्याहत्तर टक्के नुकसान होते. बीटी वांग्यात परदेशातील जीन टाकल्यामुळे त्यावर गदारोळ झाला. ते जीन खाण्यास योग्य नाही, शरीरावर त्याचा अनिष्ट परिणाम होऊ शकतो असे सांगण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर नवीन वांग्याच्या वाणाचे संशोधन करण्यात आले. जंगली वांग्यातील जीन्स (संरक्षण शक्ती) काढले आणि ते नेहमीच्या वापरातील वांग्यात टाकले, त्यामुळे नवीन निर्माण झालेले वांग्याचे वाण संकरित वाण निर्माण झाले आहे. गेल्या दहा वर्षांपासून भास्कर ठाकरे यांचे या विषयावर संशोधन सुरू होते. या संशोधनातून वांग्याच्या दहा वेगवेगळ्या जाती विकसित करण्यात आल्या आहेत. या जातींमुळे शेतकऱ्यांचा सत्तर टक्के लाभ होणार असल्याचा दावा डॉ.अशोक चव्हाण यांनी केला. दहापैकी एका वांग्याच्या जातीला "नागनाथ' असे नाव देण्यात आले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांनी विद्यापीठातील संशोधनाला प्रोत्साहन दिले.  त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे नाव देण्यात आल्याचे डॉ.चव्हाण म्हणाले. डॉ.कोत्तापल्ले यांनी त्यास मान्यता दिल्याचे त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. (सकाळवरून)
--अद्वैतुल्लाखान