...इंग्रजी शब्द मराठीत आयात केल्यावर त्याचा उच्चार इंग्रजी पद्धतीने करावयाचा की मराठी पद्धतीने, हा खरा प्रश्न आहे.

तसेच बघायला गेले, तर प्रमाण (राणी- किंवा अध्यक्ष-, कोणतेही प्रमाण, पण प्रमाण; प्रत्येक बोलीची खात्री देता येईलच, असे नाही.) इंग्रजी उच्चारांप्रमाणे या शब्दांमधील 'क्श' आणि 'न' यांच्यामधील स्वरोच्चार हा ऱ्हस्व आहे. मात्र मराठीभाषकांकडून (अगदी तथाकथित सुशिक्षित अभिजनांकडूनसुद्धा) मराठीत बोलताना हा स्वरोच्चार हमखास किंचित का होईना, पण दीर्घ होतो. कारण मराठीकरिता असाच उच्चार नैसर्गिक आहे. पण अशा एखाद्या मराठीभाषक व्यक्तीने इंग्रजीत बोलताना मात्र तो स्वरोच्चार इंग्रजी पद्धतीने ऱ्हस्व करणे हे अगदीच शक्यतेबाहेरचे नाही. (एकाच व्यक्तीकडून एकाच शब्दाचा मराठीतील आणि अन्य भाषेतील उच्चार त्यात्या भाषेच्या नैसर्गिक आघातांप्रमाणे होणे हे सहज शक्य आहे. अशा व्यक्तीच्या त्या अन्य भाषेच्या आघातांशी परिचयाच्या पातळीवर ते अवलंबून आहे.*) त्याचप्रमाणे, 'क्श' असा उच्चार मराठीकरिता अनैसर्गिक असल्यास (आणि त्याऐवजी 'क्ष' हा उच्चार नैसर्गिक असल्यास, किंवा निसर्गतः मराठीभाषकांकडून असा उच्चार सुसंगतपणे होत असल्यास) अशा शब्दांच्या उच्चारांकरिता मराठीपुरते 'क्ष'ला अंगीकारणे हे गैर नसावे.

माझ्या माहितीप्रमाणे खरे तर उच्चार रिक्शा असा करायला हवा आणि तसाच तो लिहायला हवा; पण (अति)परिचयाने(की आपुलकीने?)  तो रिक्षा असा उच्चारू जाऊ लागला आहे, असे असावे.

याचाच अर्थ 'रिक्षा' या शब्दाचे पूर्ण मराठमोळीकरण झालेले आहे असा घेता यावा काय?

मी इलेक्शनला ग्रामीण भागात इलेक्षण असेही म्हटलेले ऐकलेले आहे.

पुन्हा, हे मराठीतील नैसर्गिक उच्चारपद्धतीस अनुसरून उच्चार करण्याकडे असलेल्या कलामुळे होत असावे काय? 'मास्टर'चे मराठमोळे रूप 'मास्तर' किंवा 'पोस्ट'चे मराठमोळे रूप 'पोष्ट' जर ग्राह्य ठरते, तर त्याच नियमाने 'इलेक्षण' का ग्राह्य नसावे? 'इलेक्षण'च्याच बाबतीत तेवढे विदेशी उच्चारपद्धतीबरहुकुम होणारे रूप हे ग्राह्य, मात्र मराठी उच्चारपद्धतीबरहुकुम होणारे रूप हे अग्राह्य का ठरावे?

त्याऐवजी, 'इलेक्शन'बरोबरच किमानपक्षी एक पर्यायी (आणि प्रचलित) रूप म्हणून 'इलेक्षण'ही का स्वीकारू नये?

पूर्वीच्या काळच्या महिलांच्या तोंडी ऑफिसर ऐवजी आफीश्वर असा उच्चार असे, असे वाचायला मिळते, तसेच काहीसे.
 
अगदी अगदी! शिवाय 'प्रॉमिसरी नोट्स'ऐवजी 'परमेश्वरी नोटा' आणि 'प्रोफेसर'ऐवजी 'प्रोपेश्वर' हेही वाचलेले आहे. ('प्रोपेश्वर'वरील 'प्र + उप + ईश्वर = प्रकर्षेण उप ईश्वरः = ईश्वराच्या, येथे शंकराच्या, प्रकर्षाने जवळ असलेला = नंदी = बैलोबा' अशा काहीशा प्रकारची कोटीही ऐकलेली आहे; संस्कृत उद्धरणाची चूभूद्याघ्या.) पण हा त्या शब्दांच्या मराठमोळीकरणाचा (विदेशी उच्चारनियमांनी जखडला न गेलेला) आद्य प्रयत्न असावा, असे मानता यावे काय? (त्या महिलांना माझे प्रणाम!) आणि हे फक्त महिलांपुरतेच मर्यादित नसावे.

तसेच 'इन्स्ट्रक्शन'ऐवजी 'इंस्त्रक्षण'बद्दलही वाचल्याचे आठवते. (शिवाय 'इंग्लंड', 'स्कॉटलंड' यांऐवजी 'इंग्लंद', 'स्कॉटलंद' असेही लिहिण्याकडे कल असे, असे कळते, परंतु याचे कारण हे मराठीतील नैसर्गिक उच्चारपद्धतीशी जवळिकीपेक्षा अगोदर उल्लेखिलेली रूपे ही मराठी कानांना अश्लील भासतात असे असण्याबद्दल ऐकलेले आहे.) यामागील कारण टोपीकर त्याच्या भाषेत काहीही म्हणो, पण आपल्या भाषेत त्याचे शब्द (जेथे गरज पडेल तेथे) वापरताना ते आपल्या रिवाजांप्रमाणे का उच्चारू (आणि लिहू) नयेत, ही वृत्ती असावी, आणि ती बाळगण्यास आणि त्याप्रमाणे वागण्यास (किमानपक्षी त्या पिढीस तरी) लाज किंवा कमीपणा वाटत नसावा, असे वाटते. (टोपीकराने तरी देशी नावे आणि शब्द त्याच्या भाषेत अंगीकारताना याहून वेगळे असे काय केले?) ही वृत्ती आणि एकंदरीत हा आत्मविश्वास पुढील पिढ्यांत का नाहीसा व्हावा हे कळत नाही.

विशेषनामांच्या बाबतीत मात्र हा 'आपले रिवाज, आपल्या उच्चारपद्धती, आपले कान आणि आपल्या जिभा' न्याय किती प्रमाणात लागू व्हावा, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पूर्वी विशेषनामांच्या बाबतीतही असे सरसकट होत असे, आणि आजही मर्यादित परिस्थितींत त्यात काही गैर नसावे, परंतु विशेषनामांच्या बाबतीत असा न्याय सरसकटपणे लावण्याने क्वचित्प्रसंगी काहीशी चमत्कारिक आणि कधीकधी हास्यास्पदही परिस्थिती निर्माण होऊ शकेल असे वाटते. अधिक विचाराअंती.

*याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर "तू एक काम कर." या मराठी वाक्याचे देता येईल. या वाक्याचे हिंदीत भाषांतर करायचे झाल्यास शब्दशः जसेच्या तसे होते, परंतु आघातात प्रचंड फरक आहे. हे वाक्य मराठीत उच्चारताना 'एक' आणि 'काम' या शब्दांतील स्वर हे दीर्घ उच्चारले जातात पण अतिदीर्घ होत नाहीत, तर 'कर' या शब्दातील स्वर उच्चारी काहीसा दीर्घ होतो आणि 'र'वर अतिरिक्त आघात येत नाही. याउलट हेच वाक्य हिंदीत उच्चारताना 'एक' आणि 'काम' या शब्दांतील स्वर हे उच्चारी अतिदीर्घ होतात, तर 'कर' या शब्दातील स्वर हा अतिऱ्हस्व उच्चारला जातो आणि 'र'वर अतिरिक्त आघात येतो. किंवा दुसरे उदाहरण घ्यायचे झाल्यास 'मार्ग', 'अर्धसत्य' या शब्दातील सुरुवातीचा 'अर्ध', 'धर्म','अर्थ' किंवा  'मोक्ष' हे शब्द हिंदीतही आहेत आणि मराठीतही आहेत. हिंदीच्या काही छटांमध्ये (विशेषतः दिल्लीकडील बाजूस) या शब्दांतील अंत्याक्षर हे हलन्ताप्रमाणे उच्चारले जाते; मराठीत ते तसे उच्चारले जात नाही.

आता हिंदीशी केवळ जुजबी संबंध आलेला एखादा मराठी माणूस वरील उदाहरणांतील वाक्य किंवा शब्द हिंदीत उच्चारतानासुद्धा बहुधा मराठी आघाताने उच्चारेल, आणि त्यामुळे कितीही व्याकरणशुद्ध हिंदी बोलला तरी हिंदीभाषकांच्या गर्दीत चटकन वेगळा ओळखू येईल. मात्र हिंदी मुलुखाशी किंवा हिंदीभाषक व्यक्तींशी जुजबीहून अधिक संबंध आलेला आणि पर्यायाने हिंदीतील उच्चारपद्धतींशी सुपरिचित असलेला दुसरा एखादा मराठी माणूस अशा समाईक शब्दांचे उच्चार हिंदीत हिंदीप्रमाणे व्यवस्थित करू शकेल, परंतु त्यामुळे मराठीत बोलताना त्याच शब्दांच्या त्याच्या मराठी उच्चारांवर काही विपरित फरक पडणार नाही.

यातून सांगण्याचा मुद्दा इतकाच, की दोन भाषांमधील उच्चारपद्धतींच्या फरकाची माहिती असणे हे एकाच शब्दाचा उच्चार दोन भाषांमध्ये वेगवेगळ्या पद्धतींनी उच्चार करण्याच्या आड येऊ नये; उलट पडले तर पथ्यावरच पडावे. त्यामुळे इंग्रजीत एखाद्या शब्दाचा उच्चार 'फंक्शन' किंवा 'रिक्शा' असा होतो ही तो शब्द मराठीत 'फंक्षन' किंवा 'रिक्षा' असा उच्चारू नये, 'फंक्शन' किंवा 'रिक्शा' असाच उच्चारावा (आणि लिहावा) याकरिता कारणमीमांसा ठरू नये. सर्वसाधारण मराठी जीभ जर निसर्गतः 'फंक्षन' किंवा 'रिक्षा'कडे वळत असेल, तर केवळ इतर कोणत्यातरी भाषेत या शब्दांचा उच्चार वेगळा होतो हे कारण मराठीत बोलताना त्यांचा तसा उच्चार हा स्वीकरणीय पर्याय मानण्याच्या आड येऊ नये, असे वाटते. सर्वसाधारण मराठी जीभ ही नेमकी कशी वळते, हे शोधून काढणे मात्र महत्त्वाचे!

('रिक्षा'ची तर आणखीच गंमत. हा शब्द जपानीतून बहुधा इंग्रजीमार्गे मराठीत आला. मग याचा 'रिक्शा' हा इंग्रजी उच्चार मराठीत ग्राह्य किंवा 'शुद्ध' न मानता केवळ 'रिकिशा' हा जपानी उच्चार - यातील 'कि'मधील इकार हा बहुधा अतिऱ्हस्व, पण खात्री नाही; चूभूद्याघ्या! - हाच एकमेव ग्राह्य, योग्य किंवा 'शुद्ध' उच्चार का मानू नये? 'रिक्षा'ही नको आणि 'रिक्शा'ही नको; दोन्ही चूक! हा शब्द 'रिकिशा' असाच म्हणणे - आणि लिहिणे - तेवढे बरोबर! )

आणखी एक विचार करण्यासारखा मुद्दा हा मराठीतील तत्सम शब्दांच्या संदर्भात आहे. अनेकदा मराठीतील तत्सम शब्दांचा उच्चार हा संस्कृत उच्चारपद्धतीप्रमाणे मुळाबरहुकुम होत नाही, तर मराठी उच्चारपद्धतीप्रमाणे होतो. (यात काहीही गैर नाही.) उदाहरणेच द्यायची झाली, तर पहिले उदाहरण हे 'ज्ञान' या शब्दाचे देता येईल. या शब्दातील (किंवा अशा कोणत्याही शब्दातील) 'ज्ञ' या अक्षराचा मराठीतील उच्चार आणि संस्कृतातील उच्चार यांत पुष्कळ फरक आहे. संस्कृतातील उच्चार हा ज् + ञ असा होतो, तर मराठीतील उच्चार द् + न् + य असा होतो. किंवा दुसरे उदाहरण द्यायचे झाले, तर शेवटच्या ध्वनिसमूहात (syllableमध्ये) उच्चारी जोडव्यंजन न येणाऱ्या अनेक अकारान्त तत्सम शब्दांतील (उदा. राम, वन, योग, पाश, नियम इ.) शेवटच्या अक्षराचा मराठीतील उच्चार हा मराठी उच्चारपद्धतीस अनुसरून हलन्ताप्रमाणे होतो, तर संस्कृतात हे शब्द संस्कृतातील उच्चारपद्धतीप्रमाणे अकारान्तच उच्चारले जातात.

येथे सांगण्याचा मुद्दा हा, की संस्कृतातील (तत्सम) शब्द मराठीत जसेच्या तसे घेतानासुद्धा जेथे आपण ते मराठी उच्चारपद्धतीप्रमाणे बदलून घेतो, तेथे विदेशी (आणि त्यातही विशेष करून इंग्रजी) शब्दच तेवढे मराठीत आयात करताना त्यांचा उच्चार मुळाबरहुकुम करण्याचा अट्टाहास कशापायी? होऊ दे की त्यांचेही मराठमोळीकरण; बिघडले
कोठे?