"मुलुंड" हा उच्चार किंवा ध्वनिसमूह खास मराठी वाटत नाही (चूभूद्याघ्या), याउलट "मुळुंद" मराठी कानांना नैसर्गिक वाटतो. त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही.

तसे बघायला गेले तर "चर्नी रोड"मधील "चर्नी" हे कोणा इंग्रज गव्हर्नराचे नाव नसून गुरांना/घोड्यांना चरण्यासाठी असलेल्या "चरणी"चे (चराऊ जमिनीचे) इंग्रजी (साहेबी) रूप असल्याचे ऐकलेले आहे. मात्र कालांतराने "चर्नी" रोड हेच लोकांच्या तोंडी बसलेले असून त्या स्टेशनाच्या नावाच्या देवनागरी पाट्याही "चर्नी रोड" अशाच आहेत, आणि बोलतानाही त्याचा उल्लेख आज मराठीमध्ये कोणीही "चरणी रस्ता" किंवा गेला बाजार "चरणी रोड" असा करताना आढळत नाही. किंबहुना ते (ही माहिती बरोबर असल्यास) आज कोणाच्या लक्षातही नसावे. (मुळातील चरणी ही आज धोबीतलावाप्रमाणे किंवा "फोर्टा"प्रमाणे बहुधा केवळ नामशेष असावी.)

त्याचप्रमाणे "वांद्रे" या उपनगराचा तोंडी उल्लेख मराठीभाषक मुंबईकरांकडून मराठीत अनेकदा अगदी "बँड्रा" नाही तरी "बांद्रा" असाही ऐकलेला आहे. (मात्र "वांद्रे" हे विस्मरणात गेलेले नाही, आणि स्टेशनावरील मराठी पाटी ही "वांद्रे" अशीच आहे. हिंदी पाटी मात्र एके काळी "बान्दरा" अशी असल्याचे आठवते; अलीकडे बदलली असल्यास कल्पना नाही.)

तशाच रीतीने "मुलुंड" हा "मुळुंद"चा इंग्रजी (साहेबी) उच्चार असणे आणि कालांतराने तोच लोकांच्या तोंडी बसून मूळ उच्चार विस्मृतीत जाणे हे अशक्य नाही; मात्र माझ्याकडे याबाबत खात्रीलायक माहिती नाही.

(तसेही "काळा घोडा" किंवा "खडा पारशी" या स्थलनामांचा इतिहास आणि काळ्या घोड्यावर नेमके कोण बसले होते किंवा खडा पारशी नेमका कोण हे आज किती जणांना माहीत असावे? मला तरी कोठे ठाऊक आहे?)