केदार, आपण मांडलेला मुद्दा खरोखरंच विचार करायला लावणारा आहे. गाडगिळांच्या मुलाखत घेण्यात एक प्रकारचा तोच तो पणा जाणवायला लागला आहे हे नक्की. पण असं असलं तरीही ते उत्तम मुलाखत घेऊ शकतात याबाबत शंका घेता येत नाही. फक्त त्यांनी जुने तेच तेच संदर्भ सोडून काही नवे प्रयोग केले तर लोकांना ते नक्कीच आवडतील.

अर्थात हा तोच तो पणा फक्त गाडगिळांच्या बाबतीत आहे अशातला भाग नाही. मी स्वतः विश्व मराठी साहित्य संमेलन दुबई येथे भाऊ मराठे यांना सुत्रसंचालन करताना पाहिलं. त्यांचं सुत्रसंचालन किंवा निवेदन वाईट हमखास नव्हतं. पण हल्लिच्या काळातही तेच तेच परंपरागत चालत आलेले 'देशस्थ-कोकणस्थ' वाद आणि त्यावरून मारलेल्या व चावून चोथा झालेल्या कोपरखळ्या, यातून भाऊ मराठे बाहेर पडायला काही तयार नव्हते. गंमत अशी की असल्या बोथट विनोदांना आमच्यासारख्या दुबईस्थित मराठीप्रेमी मंडळीनी उत्स्फूर्तपणे दादही दिली. (भारताच्या बाहेर राहिलं की आमचं मराठी प्रेम जरा जास्तच उफाळून येतं आणि मग आम्ही भरपूर टाळ्या वाजवतो ! असो, हा वादाचा मुद्दा आहे....) 

कुठून तरी आपला व्यक्तीगत हिसका दाखवणे आणि आम्ही समोरच्याची चार चौघात 'कशी केली' यात समाधान मानून आपलं अस्तित्वं सिद्ध करण्याचा केविलवाणा अट्टहास मुलाखत घेणाऱ्या मंडळींनी बाजूला ठेवला आणि काळानुरूप नवनवे प्रयोग करून पाहिले, तर ते दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहतील आणि सर्वसामान्य लोक त्यांच्यावर मनापासून प्रेमही करतील.

उदाहरणादाखल, जर आपण कवी जावेद अख्तर यांनी लता मंगेशकरांची घेतलेली मुलाखत पाहिलीत तर एखाद्या 'लिजेंड' अशा व्यक्तीची मुलाखत कशी उत्तम प्रकारे घेता येऊ शकते हे दिसून येईल. (ही मुलाखत यू ट्यूब वर आपण 'life-of-lata-mangeshkar-part 1-5' असे सर्च मध्ये टाकून, मिळवून पाहू शकता.) हे उदाहरण इथे देण्याचं कारण असं की जावेद अख्तर हे गाडगीळ किंवा भाऊ मराठे यांच्याइतकेच जुने, अनुभवी आणि बुद्धिमान व्यक्तीमत्व आहे. हिंदी आणि उर्दू भाषेवरील उत्तम प्रभुत्त्व ही मुळात त्यांची जमेची बाजू आहे. याआधी त्यांनीही अनेक मोठ्या माणसांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. पण दरवेळी काहीतरी वेगळं करण्याचा आणि काळानुरूप बदलण्याचा त्यांचा प्रयत्न स्पष्टपणे दिसतो. त्यामुळेच जावेद अख्तर यांचा अजुनही लोकांना कंटाळा आलेला नाही.

शेवटी असं म्हणावसं वाटतं की गाडगीळ, भाऊ मराठे यांच्यासारख्या अनेक उत्तम आणि प्रभावी मुलाखतकारांनी आपला तोच तो पणा  थोडासा बाजूला ठेवला तर भविष्यात त्यांचा अनुभव आणि ज्ञान या गोष्टिंच्या जोरावर ते मराठी माणसांच्या मनावर कायमचा ठसा उमटवण्यात यशस्वी होतील यात संशय नाही.

थोडे विषयांतर झाले असल्यास दिलगीर आहे.

धन्यवाद, दिलसे.