आपले म्हणणे विचार करण्यासारखे आहे. त्यातील मुद्द्यांचा परामर्श घेण्याचा हा एक दुबळा प्रयत्न.
सर्वप्रथम, मी उल्लेखिलेला प्रवाद मी ऐकलेला आहे, परंतु त्यामागील तथ्याबद्दल खात्रीलायक माहिती माझ्याजवळ नाही. केवळ एक ऐकीव माहिती आणि एक शक्यता म्हणून, फॉर-व्हॉटेव्हर-इट-इज़-वर्थ-तत्त्वावर (मराठी?) मी तो मांडलेला आहे.
निमंत्रणपत्रिकेतील मजकुराबद्दल बोलावयाचे झाल्यास तथ्यात्मक विधान (स्टेटमेंट ऑफ फॅक्ट) म्हणून त्यात काही गैर (किंवा अश्लील) वाटत नाही, आणि कदाचित म्हणूनच त्या काळात ते आक्षेपार्ह वाटले नसावे. (समाजाला कधी काय अश्लील वाटू शकेल आणि कधी काय अश्लील वाटणार नाही, आणि
का, याचे भाकीत करणे हे तसेही कठीणच असल्यामुळे, 'शरीरसंबंध' अश्लील वाटला
नाही परंतु 'इंग्लंड' किंवा 'स्कॉटलंड' अश्लील वाटले, तर त्यात नेमके
आश्चर्यकारक असे निदान मला तरी काही वाटत नाही.) तसे पहावयास गेले, तर 'शरीरसंबंधा'करिता (कदाचित त्या काळातही) अत्यंत अश्लील वाटू शकणारे इतर पर्यायही मराठी भाषेत आहेत, आणि असा कोणताही पर्याय निमंत्रणपत्रिकेच्या भाषेत वापरलेला दिसत नाही, असे नम्रपणे सुचवावेसे वाटते.
इंग्लंड किंवा स्कॉटलंड आणि लंडन यांची तुलना करावयाची झाल्यास इंग्लंड, स्कॉटलंड यांसारख्या प्रयोगांत कानाला खटकणाऱ्या संबंधित ध्वनिसमूहाचे एक प्रत्यय म्हणून (पक्षी: एक शब्द म्हणून) काहीसे स्वतंत्र अस्तित्व केवळ प्रस्थापितच नव्हे, तर अधोरेखित होत असावे. लंडनच्या बाबतीत (निदान मराठी कानांकरिता तरी) ते तसे होत नसावे, आणि त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होऊन ते कानाला खटकत नसावे. (किंबहुना आचार्य अत्र्यांच्या किंवा आचार्य अत्र्यांच्या नावावर सदानंद जोशींनी खपवलेल्या - याबद्दल खात्रीलायक माहिती नाही - प्रसिद्ध कोटीअगोदर मराठीभाषकांपैकी कोणास हे लक्षात तरी आले असावे का याबद्दल मी साशंक आहे. इतिहासात तशी एखादी नोंद असल्यास त्याबद्दल निदान माझ्या कानांवर तरी काही आलेले नाही.)
कलंडणे या शब्दाबद्दलही काहीसे असेच म्हणता यावे. शिवाय कलंडणे या शब्दाचे मूळ मराठीतच असल्याने - किंवा गेला बाजार परभाषीय नसल्यामुळे - कानांना सवय होऊन त्याबद्दल काही वाटत नसावे, असाही अंदाज मांडता यावा.
हिंदीभाषकांच्या मुखी लंडनचे लंदन झाले हे आपले निरीक्षण योग्यच आहे. कदाचित कानाला खटकणाऱ्या ध्वनिसमूहाचा एक शब्द म्हणून उगम हिंदीतून झाला असावा का? किंवा किमानपक्षी त्याची मराठीतील आयात ही हिंदीतून झाली असावी का? आणि कदाचित त्यामुळे हिंदी कान या ध्वनिसमूहाच्या बाबतीत थोडे अधिक संवेदनाशील (सेन्सिटिव) असावेत का? या प्रश्नांची खात्रीलायक उत्तरे माझ्याजवळ नाहीत, परंतु या दिशेने शोध घेतल्यास बहुधा काही उद्बोधक माहिती हाती लागावी अशी शंका आहे. (तसेही हिंदीत लंडनचे जसे लंदन झाले, तसेच इंग्लंड, स्कॉटलंडचे इंग्लैंड, स्कॉटलैंड वगैरेही झाले, हा भाग आहेच.)
अर्थात, हा सर्व केवळ माझा तर्क अधिक अंदाज आहे. मिठाचा खडा हे याबरोबर उत्तम तोंडीलावणे व्हावे, हे सुचवण्याची अर्थातच गरज नसावी.
अवांतर: काही पाश्चात्य संस्कृतींत संबंधित कानाला खटकणारा ध्वनिसमूह हा स्वतंत्रपणे एक आडनावही होऊ शकतो. एकदा एका प्रकल्पावर असे आडनाव धारण करणारा एक मनुष्य प्रकल्पव्यवस्थापक म्हणून नेमलेला असता त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या आम्हा काही भारतीयांची त्याच्याविषयी हिंदीत बोलताना फारच पंचाईत होत असे, तो प्रसंग आठवतो. काही वाक्यरचना (जसे: 'समोर अमूकअमूक उभा आहे.' किंवा 'जाऊन अमक्याअमक्याला धर आणि विचार!') फारच चमत्कारिक होत. अशा प्रसंगी ही इंग्लंद, स्कॉटलंदची कॢप्ती उपयोगी पडू शकली असती. पण गरजेच्या वेळी नेमकी कॣप्ती आठवेल तर ती आमची बुद्धी कसली?