"कुठे गाडगीळ - मराठे आणि कुठे जावेद अख्तर" या "कुठे श्यामभटाची तट्टाणी आणि कुठे इंद्राचा ऐरावत" या धर्तीवर केलेल्या विधानाशी असहमत. पहिल्यानेच सांगतो की मी गाडगीळ - मराठ्यांचा चाहता नाही. किंबहुना गाडगीळ डोक्यात जातात (खरे तर पूर्वीही जायचे) या मताशी सहमत आहे. पण जावेद अख्तर यांनी घेतलेल्या लताबाईंच्या मुलाखतीत मला काहीही खास वाटले नाहीत.
बाकी जावेद अख्तर यांच्या परंपरेबद्दल दिलेली माहिती (शबनमचे साल वगळून) बरोबर असली तरीही हा युक्तिवाद पटणारा नाही. एक तर मामा, बाप, आजोबा हे सर्व लोक मोठे कवी असले तरी मुलगा चांगला कवी होईलच हे कशावरून? सासरे मोठे कवी असल्याने जावई थोर हा तर विनोदच आहे. जावेद अख्तर चांगल्या कविता/ शायरी लिहितात का हाच एकमेव निकष त्यांचे कवी म्हणून मूल्यमापन करताना मी लावीन. मला त्यांच्या गाण्यांवरून ते खास असे मोठे कवी वाटत नाही. पण हा झाला सब्जेक्टिव भाग. कोणाला वाटतीलही मोठे. पण कवींची परंपरा असलेला माणूस चांगला मुलाखतकार असतो या युक्तिवाद कसा पटावा? त्यासाठी मुलाखत चांगल्या प्रकारे घेता येणे हाच निकष नको का लावायला? एक चांगल्या मुलाखतीचे उदाहरण द्यायचे तर जानेवारी - फेब्रुवारीमध्ये सुमन कल्याणपूर यांची मंगला खाडिलकरांनी घेतलेली मुलाखत आठवते. मंगला खाडिलकरांनी सुमनताईंच्या गाण्यांचा अभ्यास केला होता असे जाणवले. तसा जावेद अख्तरांनी लताबाईंच्या गाण्यांचा केला होता असे जाणवले नाही. शिरीष कणेकर किंवा इसाक मुजावरांनी घेतलेली लताची मुलाखत ऐकायला, वाचायला किंवा बघायला जास्त आवडली असती.
परंपरेचा युक्तिवाद पुढे चालवायचा तर अन्नू मलिक, आनंद मिलिंद, राजेश रोशन, आरडी बर्मन, दिलीप सेन - समीर सेन हे सर्व दुसऱ्या पिढीतले संगीतकार अनुक्रमे सरदार मलिक, चित्रगुप्त, रोशनलाल नागरथ, एसडी बर्मन, जमाल सेन या त्यांच्या पिताजींपेक्षा मोठे संगीतकार ठरतील. कारण या लोकांचे बाप मोठे संगीतकार होते, पण पहिल्या पिढीतल्या संगीतकारांना अशी थोर परंपरा नव्हती.
रविशंकरांवर टीका करताना उस्ताद विलायतखां यांनी अशीच टीका केली होती. "माझी सतार वाजवणारी १६ वी पिढी आहे. तर रविशंकरांना अशी परंपरा कुठे आहे? त्यांचे गुरू एक बँडमास्टर आहेत," वगैरे वगैरे... अश्या प्रकारचे युक्तिवाद हास्यास्पद ठरतात.
प्रदीप
गीतकार समीर हे गीतकार अंजान यांचे सुपुत्र. गीतकार अंजान यांनी रविशंकरांनी संगीत दिलेल्या "गोदान" साठी गाणी लिहिली आहेत. आता परंपरेचाच युक्तिवाद करायचा झाला तर जावेद अख्तर, कैफी आजमी, जां निसार अख्तर यांनी रविशंकर, अली अकबर खां, विलायत खां अशा दिग्गज संगीतकारांबरोबर कुठे गाणी लिहिली आहेत? अर्थात मोठ्या संगीतकारांबरोबर काम केलेले सर्व गीतकार म्हणजे शैलेंद्र (अनुराधा, रविशंकर), नरेंद्र शर्मा (आंधियां, अली अकबर खान), साहिर (हमसफर, अली अकबर खान), अंजान (गोदान, रविशंकर), अमृता प्रीतम (कादंबरी, विलायत खां) हे सर्व एकाच पातळीवरचे थोर कवी आहेत असे म्हणणेही तितकेसे बरोबर ठरणार नाही.
साहिर आणि आनंद बक्षी हे लोक इतरांकडून गाणी लिहून घेत असा प्रवाद आहे. जां निसार अख्तरचे वाईट दिवस आसताना त्याने लिहिलेली काही गाणी साहिरने आपल्या नावावर खपवली (जां निसारला मोबदला देऊन) असे वाचले आहे.
इथे कोणीतरी पुनरावृत्तीचा प्रश्न उपस्थित केला आहे तोही योग्यच आहे. अगदी मंगलाताईंसुद्धा सुमन कल्याणपूर यांची मुलाखत दर दोन चार महिन्यांनी घेत राहिल्या तर त्याचाही कंटाळा येणारच.
विनायक