मी माझ्या अनुभवातून गुणकारी वाटलेले उपाय सुचवत आहे.

१) पित्ताची भावना अतितीव्र असेल, उमासे येत असतील आणि उलटी होणार असे वाटत असेल तर काहीही उपाय न करता उलटीवाटे जेवढे पित्त पडेल तेवढे पडू द्यावे. त्यामुळे शांत वाटते.

२) पित्ताची भावना तीव्र असेल, पण उलटी होत नसून नुसतीच जळजळ होत असेल, डोके दुखत असेल तर चटकन जवळच्या दुकानातून व्हॅनिला आइस्क्रिम खावे. यामुळे पित्त लगेच बसते.

३) पित्ताची लक्षणे जाणवू लागताच सूतशेखर मात्रेच्या गोळ्या दिवसातून तीन वेळा घ्याव्यात. कानशिलाला आणि तळपायाला कैलास जीवन मलम चोळावे. शहाळ्याचे पाणी प्यावे.

४) पित्ताचा जुनाट त्रास असणाऱ्यांनी सकाळी उठल्यानंतर अनुषा पोटी लगेच प्रवाळपिष्टीयुक्त गुलकंद एक चमचा चावून खावे व त्यावर भांडेभर थंड पाणी प्यावे. नंतर १५ मिनिटांनी चहा घेतला तरी चालेल. अशा व्यक्तींनी सायंकाळचे जेवण लवकर म्हणजे सात-साडेसातला घ्यावे आणि जागरण टाळावे. जागरण अपरिहार्य झाल्यास डोळ्यांना, कानशिलांवर, तळपायाला, बेंबीभोवती कैलास जीवन मलम चोळावे आणि डोक्याची टाळू तसेच शिखास्थानी नवरत्न थंडा तेलाने मसाज करावा.

५) उन्हाळ्यात बाहेर पडताना टोपी अथवा पांढरा रुमाल डोक्याला बांधून व डोळ्यांना सनग्लास घालून जावे आणि तळपाय उघडे ठेऊ नयेत. उन्हातून आल्यावर प्रथम थंड पाण्याखाली तळपाय धरावेत व नंतर गूळपाणी घ्यावे. फ्रीजमधील पाणी ढोसू नये. पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी तळपाय, डोके व डोळे यांची विशेष काळजी घ्यावी, यास्तव ही सूचना.