यात "लंड" हा शब्द " द्रोही" या अर्थाने वापरला आहे असे वाटते. आजोबांचे
श्राद्ध करायचे की नाही यावरून एकदा आजी आणि वडिलांचे भांडण चालले असताना
(वडील ते करायच्या विरुद्ध होते आणि आजी करायच्या बाजूने) ती वडिलांना
"तुम्ही लोक धर्मलंड आहात" असे रागाच्या भरात म्हणाल्याचे (आणि मी मोठ्या
कष्टाने हसू आवरल्याचे ) आठवते.
मान्य. पण यात संबंधित शब्दाचा अर्थ (आणि संदर्भ) हा त्या शब्दास आज लाभलेल्या (आणि अश्लील वाटणाऱ्या) अर्थापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे, हेही येथे लक्षात घेणे इष्ट आहे. कदाचित या शब्दाकरिता अश्लील वाटणारा अर्थ नंतर (आणि कदाचित पूर्णपणे वेगळ्या स्रोतातूनही) आला असू शकेल. शिवाय अश्लील न वाटणारा मूळ अर्थ नंतर कदाचित काही मर्यादित गोटांपुरता वापरात राहिला असू शकेल (आणि म्हणूनच त्या गोटांत आणि त्या अर्थाने त्याचा वापर अश्लील वाटत नसेल - आणि कदाचित म्हणूनच आपल्या आजींना तो त्या संदर्भात वापरताना काहीही अश्लील न वाटणे, किंबहुना त्या शब्दाच्या अश्लीलतेबद्दलचा विचारही मनास न शिवणे, हे साहजिकच आहे!), परंतु व्यापक समाजात ('ऍट अ ब्रॉडर लेवल' किंवा 'इन सोसायटी ऍट लार्ज' अशा अर्थी) त्याचा नवीन आणि अश्लील भासणारा अर्थ खूपच अधिक प्रमाणात प्रचलित असू शकेल, इतका की, तो शब्द उच्चारता सर्वप्रथम हा नवीन अर्थच बहुतांशांना अभिप्रेत होऊ लागला असू शकेल. (हे सहज शक्य आहे. समांतर उदाहरण द्यायचे झाले तर 'शांभवी' या शब्दाचा मूळ अर्थ 'शंभूची पत्नी' किंवा 'शंभूची लाडकी', अर्थात 'पार्वती(चे एक नाव)' असा आहे. (संदर्भः मोल्ज़वर्थ .) परंतु हा शब्द उच्चारताच आमच्यासारख्यांच्या सर्वप्रथम लक्षात येतो, तो या शब्दास नंतर लाभलेला छुपा अर्थ, अर्थात 'भांग'! इतका, की एखाद्या मुलीचे 'शांभवी' असे नाव ऐकून आम्हास सर्वप्रथम असा प्रश्न पडतो की कोणताही बाप आपल्या पोटच्या पोरीचे नाव असे ठेवूच कसे शकतो म्हणून!)
आपल्याला असा शब्दप्रयोग ऐकून हसू आले आणि ते आवरावे लागले, यातच सर्व आले नाही काय? या शब्दाचा मूळ अर्थ पूर्णपणे वेगळा असला आणि अजिबात अश्लील वाटण्यासारखा नसला, तरीही एका विशिष्ट आणि अतिमर्यादित संदर्भाबाहेर त्याचा दुसरा आणि अश्लील वाटू शकण्यासारखा अर्थ त्याहून खूपच अधिक प्रमाणात प्रचलित असावा, हेच यातून अधोरेखित होत नाही काय?
कदाचित या गोंधळात इंग्लंड, स्कॉटलंडची आणखी भर नको या कारणाकरिता त्या काळात त्याऐवजी इंग्लंद, स्कॉटलंद असे पर्याय वापरण्याकडे कल वाढला असू शकेल, असे वाटते. अर्थात, लवणस्फटिकन्याय सर्वत्र लागू आहेच.
(अवांतर: तसेही काही मर्यादित संदर्भांत एक अर्थ असण्याचे परंतु त्या संदर्भाबाहेर किंवा एकंदर संदर्भाविना काही भलताच अर्थ होत असण्याचे हे एकमेव उदाहरण नसावे. बरीच सामान्य उदाहरणे लक्षात येतात. शाळेत असताना बहुधा बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातून शिकलेल्या चोखोबांच्या अभंगातील तखल्लुसाचे वाक्य - 'चोखा म्हणे माझा प्राणांचा तो प्राण' - हे वस्तुतः अजिबात अश्लील नाही. मात्र त्या मर्यादित संदर्भचौकटीबाहेर आणि स्वतंत्रपणे ते ऐकू आल्यास भयंकर अश्लील वाटू शकते. किंवा, 'सुईत दोरा ओवायचा आहे, तो नेमका कोठे घालू? ' असा प्रश्न विचारण्याचे खरे तर कोणाला काही कारण असू नये, परंतु असा प्रश्न जर का कोणी विचारलाच, तर त्याला देता येण्यासारखे एकमेव उत्तर हेही खरे तर सरळसोट आहे, पण पुन्हा त्या संदर्भाबाहेर कोणाला त्यातून भलताच काही अर्थ प्रतीत होऊ शकेल. किंवा, 'आज अचानक गांठ पडे' ही एक अतिशय सुंदर काव्यपंक्ती आहे. परंतु संदर्भाविना यातून एक अतिशय बद्धकोष्ठी अर्थही कोणाला प्रतीत होणे सहज शक्य आहे.
मराठी भाषेच्या नेमक्या याच वैशिष्ट्याचा भरपूर फायदा एका प्रथितयश आणि अतुलनीय दिवंगत चित्रपटव्यावसायिकास लाभलेला आहे, असे ऐकण्यात आलेले आहे. चूभूद्याघ्या.)