'परभाषीय शब्द मराठीत लिहिताना मूळ भाषेतील उच्चारानुसार लिहावेत किंवा नाही' या चर्चाविषयाशी 'इंग्लंड, स्कॉटलंड वगैरे शब्द मराठीत लिहिताना मूळ उच्चाराबरहुकुम न लिहिता इंग्लंद, स्कॉटलंद असे लिहिण्याकडे कल आणि त्यामागील कारणमीमांसा' यावरील चर्चा ही सुसंगत आहे. आणि 'अशा शब्दांचा काही भाग हा मराठी कानांना अश्लील वाटतो म्हणून लिहिताना बदलावा ही  कारणमीमांसा असावी' असे (मूळ चर्चाविषयाशी सुसंगत असे) प्रतिपादन केल्यावर, अशा प्रतिपादनाबद्दल काही शंका उपस्थित झाल्यास, त्या प्रतिपादनामागील तथ्य जाणण्यासाठी किंवा त्यामागील सत्यासत्यता पडताळण्यासाठी आवश्यक होणारी कोणतीही उपचर्चा ही विसंगत किंवा चर्चा भरकटवणारी असावी असे वाटत नाही.

अशा उपचर्चेतून अशा प्रतिपादनामागील तथ्य निर्विवादपणे प्रस्थापित झाल्यास ते 'इंग्लंड, स्कॉटलंड वगैरे शब्द मराठीत लिहिताना मूळ उच्चाराबरहुकुम न लिहिता इंग्लंद, स्कॉटलंद असे लिहिण्याकडे कल आणि त्यामागील कारणमीमांसा' यावरील मूळ चर्चाविषयाशी सुसंगत चर्चेस (आणि त्या अनुषंगाने काही तथ्य प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने मूळ चर्चेस) पोषकच ठरावे. उलटपक्षी, असे प्रतिपादन तथ्यास धरून नाही असे निर्विवादपणे निष्पन्न झाल्यास (किंवा त्या प्रतिपादनाच्या सत्यासत्यतेबद्दलची शंका कायम राहिल्यास) मूळ चर्चेतील एक मुद्दा 'तथ्यास धरून नाही म्हणून (किंवा निर्विवादपणे प्रस्थापित होऊ शकत नाही म्हणून) विचारार्ह नाही' या कारणास्तव निकालात निघून तेही चर्चेस पोषकच ठरावे.

चर्चेतून काही निष्पन्न झाल्यास ते सर्वांच्याच फायद्याचे असले, तरी या कारणास्तव चर्चेचे फलित प्रस्थापित होण्याची घाई असू नये, असे वाटते.

मुंबईतील फ़्लोरा फ़ाउन्‍टनजवळील लुंड आणि ब्रॉकली या चष्म्याच्या दुकानाचे  सुधारित नामकरण करण्यामागे हेच कारण असले पाहिजे.

या दुकानाच्या नावाचा आपण दिलेला मुळाबरहुकुम उच्चार चुकीचा आहे. सर्वप्रथम, या नामद्वयातील दुसरे नाव 'ब्रॉकली' असे नसून 'ब्लॉकली' असे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, या नामद्वयातील पहिल्या नावाचा उच्चार मुळाबरहुकुम करायचा झाल्यास तो 'लुंड' असा नसून, मराठी कानांस अश्लील भासण्यासारखाच आहे. वर एका प्रतिसादात मी काम केलेल्या एका जुन्या प्रकल्पावरील प्रकल्पव्यवस्थापकाचा दाखला दिलेला आहेच. अधिक खात्रीसाठी हा दुवा पाहावा. दुव्यावर या नावाचा उच्चार ऐकण्याचीही सोय आहे. (दुवा त्या नावाच्या गावाबद्दल असला, तरी ते गाव ज्या भौगिलिक प्रदेशात आहे त्याच भौगोलिक प्रदेशात या आडनावाचेही मूळ असल्याकारणाने दोहोंत संबंध असावा, किंवा किमानपक्षी दोहोंचा उच्चार सारखा असावा, असा तर्क मांडता यावा. चूभूद्याघ्या.)

अवांतर: आपल्या म्हणण्याप्रमाणे या दुकानाचे सुधारित नामकरण झालेले असल्यास ते सुधारित नामकरण काय असावे याबद्दल कुतूहल आहे. (अर्थात, या कुतूहलाचा प्रस्तुत चर्चेशी फारसा संबंध नाही. किंवा म्हटले तर आहे.)

अतिअवांतर: पूर्वी (म्हणजे बहुधा ब्रिटिशांच्या जमान्यात, पण खात्री नाही; चूभूद्याघ्या.) याच नावाची एक घड्याळे बनवणारी कंपनीही हिंदुस्थानात कार्यरत होती, आणि त्या घड्याळ बनवणाऱ्या कंपनीची लंडनमध्ये ऑफिसेही होती, असे कळते. या घड्याळ बनवणाऱ्या कंपनीचा चष्म्यांच्या दुकानाशी काही संबंध असावा काय, याबद्दलही कुतूहल आहे. (या कुतूहलाचा मात्र प्रस्तुत चर्चेशी काहीही संबंध नाही.)