धर्मलंड हा शब्द काहीसा अश्लील आहे, असे मोल्सवर्थ  शोधसूत्र ) ने लिहिले आहे ते वर आलेच आहे.

या शब्दाची फोड करून त्यातील कानाला खटकणाऱ्या भागाचा सामान्यतः प्रचलित आणि अश्लील भासणारा असा अर्थ मोल्जवर्थच्या शब्दकोशातील प्रस्तुत शब्दाच्या नोंदीत नमूद केलेला आहे खरा. परंतु त्या कानाला खटकणाऱ्या भागास इतरही काही अर्थ आहेत का, आणि/किंवा या विशिष्ट शब्दाच्या संदर्भात त्या भागाचा हा सामान्यतः प्रचलित आणि अश्लील भासणारा अर्थच लागू आहे की अन्य एखादा पर्यायी अर्थ या संदर्भात लागू होऊ शकतो, अत एव 'धर्मलंड' हा शब्द खरोखरच अश्लील आहे का (थोडक्यात  मोल्ज़वर्थची या ठिकाणी अंदाजात चूक झालेली असू शकते का) याबद्दल खात्रीलायक माहिती देणारा अन्य एखादा स्रोत उपलब्ध आहे काय?

कितीही झाले तरी मोल्ज़वर्थ हा मराठीभाषक नव्हे आणि संस्कृतपंडितही नव्हे. त्याने संकलित केलेला मराठी शब्दकोश हा कितीही उत्कृष्ट असला तरी शेवटी त्याला या कामात नेटिवांच्या मदतीवर आणि काही प्रमाणात स्वतःच्या आणि इतरांच्या तर्कावर आणि अंदाज-अटकळींवर अवलंबून राहावे लागले असणारच. पैकी नेटिवांची मदत त्याला अचूक मिळाली असे जरी मानले, तरी क्वचित जेथे थोड्याफार प्रमाणात त्याला तर्कावर आणि अंदाज-अटकळींवर अवलंबून राहावे लागले असेल, तेथे असे अंदाज आणि अशा अटकळी या शंभर टक्के खात्रीलायक मानता येतील काय? 'धर्मलंड' या शब्दाची फोड आणि त्यातील दुसऱ्या भागाचा एक (नमूद केलेला) उपलब्ध अर्थ ही मोल्ज़वर्थला (बहुधा नेटिवांकडून) मिळालेली माहिती अचूक आहे, परंतु (१) या शब्दाच्या दुसऱ्या भागाकरिता इतर कोणताही अर्थ उपलब्ध नाही, आणि/किंवा (२) या शब्दाच्या दुसऱ्या भागाकरिता या शब्दाच्या संदर्भात हाच अर्थ लागू आहे ही मोल्ज़वर्थची माहिती आणि/किंवा तर्क कितपत खात्रीलायक आहे?

(काहीसे समांतर उदाहरण विचारात घ्यायचे झाल्यास, 'तशरीफ़ रखिए' हा वाक्प्रचार उर्दूत साधारणतः 'बसा' अशा अर्थी वापरला जातो. आता या वाक्प्रचारातील 'तशरीफ़' या शब्दाचा अर्थ 'बूड' असा असण्याबाबत - आणि म्हणूनच या वाक्प्रचाराचा शब्दशः अर्थ 'बूड ठेवा' किंवा 'बूड टेकवा' असा असण्याबाबत - एक किंवदंता किंवा 'अर्बन लीजेंड' प्रचलित आहे. तीत बहुधा काहीही तथ्य नाही. किमानपक्षी तिला पुष्टी देणारा कोणताही खात्रीलायक स्रोत उपलब्ध नाही. किंबहुना शब्दकोशांत या शब्दाचा अर्थ साधारणतः 'गौरव', 'सन्मान' किंवा 'प्रतिष्ठा' यांच्याजवळ जाणारा सापडतो. आता समजा मी स्वतः उर्दूभाषक नाही, आणि राज्यकारभाराच्या सोयीकरता म्हणा किंवा इतर कारणांकरिता म्हणा, एखादा उर्दू शब्दकोश संकलित करण्याची जबाबदारी माझ्यावर पडलेली आहे. त्यात मी पडलो एखाद्या बाह्यसत्तेचा प्रतिनिधी. अशा परिस्थितीत माझ्या कानावर या वाक्प्रचाराबाबत केवळ ही किंवदंता आली. त्यात माझ्या समग्र नेटिव स्रोतांना बाह्यसत्तेवरील त्यांच्या रागातून एकजात एकसमयावच्छेदेकरून माझी फिरकी घेऊन बाह्यसत्तेवर वचपा काढण्याची हुक्की आली, आणि त्यातून त्यांनी तीच किंवदंता उचलून धरली. (असे होणे अगदीच अशक्य नसावे. नेटिवांना विनोदबुद्धी नसते असे कोणी म्हटले?) आणि अशा प्रकारे माझ्या कानावर आलेल्या आणि माझ्या नेटिव स्रोतांकडून मिळालेल्या 'माहिती'च्या अधिक माझ्या तर्काच्या आणि अंदाज-अटकळींच्या आधारावर मी ही व्याख्या माझ्या शब्दकोशात छापली, तर नेमके काय होईल? बहुधा आपले काही भयंकर चुकलेले आहे याचा मला पत्ताही लागणार नाही. मी पूर्णपणे माझ्या स्रोतांच्या विश्वसनीयतेवर विसंबून राहिलेलो असेन. त्यात पुन्हा मला बहुधा समकालीन शब्दकोशही उपलब्ध नाहीत कारण कोणी कधी लिहिलेले नाहीत, आणि इतर लेखी किंवा वाङ्मयीन स्रोत मुबलक जरी असले तरी त्यातील ज्ञान ग्रहण करण्यासाठी मला माझ्या नेटिव स्रोतांवर विसंबून राहणे किंवा स्थानिक पंडितांशी चर्चा करणे भाग आहे. आणि ते सगळे माझ्या फिरकीत, मला उल्लू बनवण्यात सामील आहेत. किंवा, माझ्या नेटिव स्रोतांनी इतक्या ठामपणे आणि इतक्या साळसूदपणे मला हे सांगितले आहे, इतक्या प्रभावीपणे माझी फिरकी घेतलेली आहे, की याबद्दल शंका घेण्याचे किंवा ही माहिती इतरत्र पडताळून पाहण्याचे मला सुचलेलेही नाही. शिवाय, आतापर्यंत इतर एवढ्या सगळ्या शब्दांचे संकलन करताना जर माझ्या नेटिव स्रोतांनी मला कधी फसवलेले नाही, तर आताच का बरे फसवतील? शिवाय, इतक्या ठामपणे माझे इतके स्रोत एकवाक्यतेने ही माहिती सांगत असता या एका छोट्याशा शब्दाच्या अर्थाबद्दल शंका घेऊन पडताळणी करत इतर स्रोत असतील नसतील कोण जाणे, ते धुंडाळत वेळ वाया घालवण्यापेक्षा, इतर हजारो शब्दांचे अजून संकलन करायचे आहे, त्यालाही वेळ लागणार आहे, आणि मला माझा शब्दकोश काही ठराविक काळाच्या आत पूर्ण करायचा आहे. आणि त्याकरिताही मला माझ्या नेटिव स्रोतांची मदत लागणार आहे. तेव्हा मी माझ्या नेटिव स्रोतांवर विश्वास टाकलेला बरा.

अर्थात या स्वैर कल्पनाविलासात बरीच अतिशयोक्ती आहे हे मान्य. परंतु तरीही मोल्ज़वर्थच्या बाबतीत या शब्दाच्या संदर्भात तो जाणूनबुजून फसवणुकीला नाही, तरी अपुऱ्या माहितीला बळी पडला असण्याची शक्यता, इतर पर्यायी माहितीचा पूर्ण अभाव खात्रीलायकरीत्या प्रस्थापित केल्याशिवाय पूर्णपणे नाकारता येणार नाही असे वाटते. चूभूद्याघ्या.)