नावातली चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. बरेच दिवसांत मुंबईच्या फाउन्टन भागातून फेरफटका मारला न गेल्याने थोडे विस्मरण झाले, असे दिसते आहे. दुकानाचे मूळ नाव Lund and Blockley असेच होते, आणि देवनागरीतही ते पूर्वी बहुधा मूळ उच्चाराबरहुकूम लिहिलेले असावे. आता त्यांतला पहिला शब्द सुधारून लुंड असा रंगवला गेल्याचे काही वर्षांपूर्वी ध्यानात आले होते. ते मूळचे घड्याळाचेच दुकान होते. दुकानाबाहेरच्या दर्शनी कपाटात जगातल्या अनेक ठिकाणांची स्थानिक वेळ दाखवणारी काही घड्याळे लावलेली असत. जगप्रसिद्ध रॉलेक्स कंपनीचे सर्वात महागडे मनगटी घड्याळ फक्त त्याच दुकानात मिळत असे. याच दुकानाची फोर्टव्यतिरिक्त वांद्ऱ्यालाही एक शाखा असल्याचे आठवते. मात्र, हल्लीहल्ली, लुंड ऍन्ड ब्लॉकलीमध्ये घडाळ्यांव्यतिरिक्त चष्मे, भिंगे आणि दुर्बिणी पाहिल्यासे वाटते. तिथून, केकी मेहता या कुलाबा बस स्टेशन येथील नामवंत नेत्रतज्ज्ञाने माझ्यासाठी शिफारस केलेल्या खास बनावटीचा एक चष्मा बनवून घेतला होता, हे नक्की.
फोर्टमध्ये लॉरेन्स ऍंड मेयो नावाचे आणखी एक प्रसिद्ध आणि जुने दुकान आहे. तेथे चष्म्यांशिवाय शास्त्रीय उपकरणेही मिळतात. आधीचा प्रतिसाद लिहिताना त्या नावाचा आणि लुंड ऍन्ड ब्लॉकली या नावांचा क्षणभर घोटाळा झाला होता. --अद्वैतुल्लाखान