मी गाताना गीत.. (येथे ऐका)
मी गाताना गीत तुला लडिवाळा
हा कंठ दाटुनी आला..
एक होता विदूषक चित्रपटातलं एक अप्रतिम अंगाई गीत. आनंद मोडकांचं सुंदर संगीत, आणि रवींद्र साठ्यांची सुरेख गायकी!
रानकवी महानोरांचे सुंदर शब्द लाभले आहेत या गाण्याला. ..
मी दुःखाच्या बांधुन पदरी गाठी
जपले तुज ओटी-पोटी
कधी डोळ्यांना काजळ तुज
भरताना
गलबला जीव होताना..
अंगाईला साजेशी छान संथ लय, तेवढीच शांत, सुरेख, हळवी चाल! जीव अगदी सुखावतो हे सुंदर गाणं ऐकून..
एका होता विदूषक हा पुलंचा परीसस्पर्श झालेला चित्रपट. लक्ष्मीकांत बेर्डे हा अत्यंत गुणी कलाकार परंतु केवळ पाचकळ, उथळ विनोदी भूमिकांपलीकडे कुठल्याच निर्माता-दिग्दर्शकाला त्याचा उपयोग करून घेता आला नाही हे भाईकाकांचं मत.. आणि म्हणूनच या चित्रपटातल्या विदूषकाच्या भूमिकेकरता स्वत: भाईकाकांनी लक्षाचं नांव सुचवलं होतं. आणि लक्षानेही चांगलं काम करून भाईकाकांचा शब्द राखला.
या गाण्याच्या निमित्ताने, अकाली काळाच्या पडद्याआड गेलेल्या लक्षाला आणि त्याच्यातल्या गुणांची पारख असलेल्या भाईकाकांना विनम्र अभिवादन..
--तात्या अभ्यंकर.