पुलंच्या बटाट्याच्या चाळीतून दिसणारी संपन्नता वगैरे, ८० व ९० च्या दशकांतले चाळींतील सहजीवन आणि चाळींची सद्यस्थिती यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे, हे नक्की. चित्रपट अद्याप पाहिलेला नाही; मात्र चित्रपटातल्या ज्या प्रसंगांबद्दल तुम्ही मत व्यक्त केले आहे, ते प्रसंग अतिरंजित नसावेत, असे वाटते. त्यामुळे चित्रपट पाहताना बटाट्याच्या चाळीशी तुलना केली जाणे काहीसे नैसर्गिकच असले, तरी टाळता आल्यास उत्तम, असे वाटते.
गिरणगावातील, दादर, गिरगाव वगैरे परिसरातील चाळींची सद्यस्थिती फारशी स्पृहणीय नाही हे नक्की. गलिच्छपणा नसला तरी वाढती गुंडगिरी आणि कोवळ्या वयातच गुन्हेगारी प्रवृत्ती बाळगून असलेली व्यसनी मुले-मुली, गुजराती-मारवाडी रहिवाश्यांचा वाढता प्रभाव, व्यक्तीविकास आणि व्यक्तीस्वातंत्र्याबाबतच्या चुकीच्या कल्पना, चाळीतील मूळ, मराठी रहिवाश्यांनी आपापली चाळींतील बिऱ्हाडे तशीच बंद ठेवून, गुजराती-मारवाडी यांना विकून किंवा पोटभाड्याने देऊन ठाणे, पार्ले, डोंबिवली, पुणे येथे केलेले स्थलांतर हे चाळजीवनाचे आजचे वास्तव आहे. आणि उरल्यासुरल्या चाळी भू-विकासकांच्या घशात घालून तेथे प्रशस्त मॉल्स, गगनचुंबी इमारती व मल्टिप्लेक्स यांच्या स्वरूपातली विकासचिन्हे उभारणारे चाळमालक व सरकार हेच आजचे वास्तव आहे. हाती टमरेल  घेऊन घराबाहेर शौचास जाण्याची लाज जेव्हा व्यक्तीस वाटेल, पाणीकपातीच्या काळात चौकातील टाकीतून बादल्या भरभरून तीन मजले वर पाणी वाहून नेण्यातील शारीरिक व मानसिक क्लेष सोसेनासे होतील, जुगार खेळताना रंगेहात पकडले गेल्यावर किंवा गच्चीतील टाकीमागचे प्रेमप्रकरण पकडले गेल्यावर थोतरीत ठेवून देण्यासाठी वडिलांनी उगारलेला हात अडवण्यापर्यंत मुलामुलींची मजल जाईल, तेव्हा चाळीतील रहिवाशी कमी होण्याची सुरुवात होणार, हे नक्की! जन्मल्यापासून वयाची २२ वर्षे दादरमधील चाळीत काढल्यानंतर, आजही तेथे राहणाऱ्या आईवडिलांच्या आजच्या अनुभवांवरून आणि षठीसामाशी प्रत्येक सुटीत तेथे जाऊन कमीत कमी तीन आठवडे राहिल्यानंतर मी या निष्कर्षाप्रत आलो आहे.