चर्चगेट हा संदर्भबिंदू घेऊन चाललो होतो; दादर हा(सुद्धा) संदर्भबिंदू असू शकतो हे लक्षातच आले नाही!

दादर हा संदर्भबिंदू असल्यास कवी परळला जात असणेही अगदीच अशक्य नाही. म्हणजे कवीची केवळ दिशाच चुकलेली नाही, तर सेंट्रल-वेस्टर्नमध्येही घोळ झालेला असणे शक्य आहे.

याचा अर्थ कवी मुंबईत नवखा असावा. किंबहुना प्रथमच दादरला आला असावा आणि प्रथमच दादरहून (लोअर) परळला जात असावा. अट्टल मुंबईकरास ते ईस्ट-वेस्ट, सेंट्रल-वेस्टर्न, दादरपासून लोअर परळ चर्चगेटच्या दिशेस आले की बोरिवलीच्या (किंवा पर्यायाने परळ व्हीटीच्या दिशेस आले की ठाण्याच्या - आम्ही जुनी खोंडे सवयीने व्हीटीच म्हणणार, किंवा अगदीच मराठीत बोलत असलो तर बोरीबंदर!), वगैरे भानगडी व्यवस्थित कळतात. तो चुकीच्या स्टेशनावरून चुकीच्या गाडीत शिरणे शक्यच नाही! अगदी वेस्टर्न लायनीवर राहणारा माणूस परळला जाण्याकरिता आयुष्यात प्रथमच दादर (सेंट्रल) स्टेशनावर आला तरी प्रथम इंडिकेटर पाहूनच गाडीत चढेल, आणि दादर (वेस्टर्न)च्या फलाटावरील गाडी तर नक्कीच पकडणार नाही.

इथवर ठीक आहे. पण मग प्रश्न असा पडतो, की मुंबईत आवर्जून पहायला जाण्याच्या लायकीची इतकी ठिकाणे असताना दादरच्या फलाटावर प्रथमच उतरलेला कवी सगळे सोडून सर्वप्रथम (लोअर) परळलाच का जाऊ पाहतोय? नाही म्हणजे, त्याबद्दल कविताही करतोय म्हणून ही शंका येते. (लोअर) परळमध्ये (कविता कामगारक्रांती वगैरेबद्दलची असल्याखेरीज) कविता करण्यासारखे नेमके काय आहे? 'दिशाभूल झाली' हेच जर दाखवायचे होते, तर परळ आणि खारमध्येच असे काय विशेष आहे? केवळ यमक जुळते आणि वृत्तात बसते म्हणून बसवायचे? त्याऐवजी 'कुलाब्या जायचे होते तिथे मी पारला गेलो' असे म्हटले तर? ('पारला' = 'पार्ले'. ठीक आहे, कुलाब्याला जायला चर्चगेटवरून पुढे टॅक्सी पकडावी लागते, आणि टॅक्सीला पैसे पडतात; पण वचने किं दरिद्रता?)