गिरणगावाबरोबरच बटाट्याची चाळ व गिरगाव-दादरमधील चाळींचा उल्लेख हा वरील लेखनातील त्याबाबतच्या उल्लेखांच्या (खांडके बिल्डींग, दादर; शारदा बिल्डींग, टोपीवाला लेन इ. ) अनुषंगानेच केला आहे. कामगारांच्या वि. कारकुनांच्या चाळी अशी तुलना योग्य नसावी, हे पटण्यासारखे आहे. पण कामगारांच्या चाळींतील घरातल्या एकमेव कर्त्या पुरुषाची नोकरी गेल्यानंतर उत्पन्न बंद होणे, कुटुंबाचे हाल इ. लक्षात घेता संस्कारक्षम, अडनिड्या वयांतील त्यांची मुलेमुली गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणे सहज शक्य आहे, असे वाटते. सिनेमात कामगारांची चाळ व त्या चाळीतील जीवनच चित्रित केले आहे, असे मानल्यास ओंगळवाणेपणा नि भडकपणाबद्दल तक्रार करण्यात हशील नाही, असे वाटते.
माझ्या माहितीनुसार हा चित्रपट, चित्रपटातील प्रमुख पात्रे (नरू, मोहन, सावर्डेकर मामी इ. ) नि प्रसंग 'अधांतर' या नाटकातून जसेच्या तसे किंवा कमीजास्त फरकाने उचलले आहेत. ते नाटक मी पाहिले आहे; अप्रतिम, वास्तविक, रोखठोक नि पांढरपेशा रसिकांसाठी बऱ्यापैकी भडक आहे, यात वाद नाही. तसे असल्यास चित्रपटातील भडकपणा किंवा ओंगळवाणेपणाबद्दल सुषमाताईंची तक्रार पटत नाही. किंबहुना अशा गोष्टी अपेक्षितच असाव्यात, हे मनाला समजावले तर तक्रारीला वाव राहणार नाही.