समाजाची मित्र आणि शत्रू अशा सरळ सरळ दोन गटांत विभागणी होऊ शकत नाही. एकाच मनात मित्रत्वाच्या आणि शत्रुत्वाच्या भावना नांदत असतात. देश सोडून जातात ते देशशत्रू आणि इथेच राहातात ते मित्र अथवा हितैषी ही भावनासुद्धा चुकीची आहे. शिवाय रागाने धुमसणाऱ्या मनापेक्षा तळमळ, कळकळ आणि सहानुभूतीने भरलेल्या मनाकडून पुष्कळ अधिक प्रमाणात कार्य घडू शकते. 'काहीतरी भव्यदिव्य' करून दाखवल्यानेच देशसेवा होते असे नाही आणि सगळ्यांनाच हे 'भव्यदिव्य' जमेल असे नाही.शिवाय हे 'भव्यदिव्य' म्हणजे नेमके काय, ते समजत नसते. देशसेवा म्हणजे नक्की काय, तेही उमगलेले नसते. देशसेवा म्हणजे देशभूमीची सेवा, देशात नांदणाऱ्या लोकसमूहांची सेवा, त्यातूनही विशिष्ट लोकसमूहांची सेवा, किंवा कसे ह्याविषयी संभ्रम असतो. मुळात 'सेवा' ह्या शब्दालाच आक्षेप असू शकतो. आपल्या स्वतःच्या नजरेतून समाज जसा दिसायला हवा, तसा असण्यासाठी आपण काहीतरी करणे ही कुणाचीही सेवा होऊ शकत नाही.हे सर्व आपल्या आनंदासाठी असते आणि तसेच ते असायला हवे.
माझ्या अल्पमतीप्रमाणे स्वतः आनंदी असणे,आपला निकट परिवार, परिसर आनंदी राखण्यासाठी धडपडणे, आपण ज्या ठिकाणी, ज्या पायरीवर असू, तेथे यथाशक्ति प्रामाणिकपणे, नीतीने वागून कर्तव्य पार पाडणे, कष्टांना न भिणे, संघर्षापेक्षा सामंजस्याने कार्य साधेल असे बघणे,एक क्षणही आळसात न घालवणे, देवाला, समाजाला, परिस्थितीला दोष न देता सतत आत्मपरीक्षण करून पूर्वी घडलेल्या चुका सुधारत राहणे, वाणीवर ताबा ठेवणे,चेहरा व वाणी प्रसन्न राखणे, समाजव्यवस्था सुदृढ राहावी याकरिता केलेले नियम न कुरकुरता पाळणे, अशा काही साध्यासाध्या गोष्टीतून माणूस घडत जातो, मोठा होतो. पर्यायाने समाज आणि देशही मोठा होतो. शिस्तबद्ध कामसू व्यक्तींची बहुसंख्या झाली की त्या देशाची प्रतिमा तशी बनते. शिस्तबद्ध कार्यामुळे यश, प्रसिद्धी, धन, लक्ष्मी, आपोआप चालत येतात.
असो.ध्येयवेड्यांना ध्येय गवसावे ही प्रार्थना.