गटार, शौचकूप ह्या गोष्टी सत्य असल्या तरी नकाराची ती मूळ कारणे नसण्याचीही शक्यता असेल असे वाटते. त्यातही दोन शक्यता आहेत. ज्याला/जिला नकार द्यायचा त्याला/तिलाच खरे कारण कळवायचे/कळवलेले नसेल किंवा त्याला/तिला खरे कारण कळवलेले असेल पण त्रयस्थांना सांगण्यासाठी अशी कारणे दिली गेली असतील. ...

ही शक्यता नाकारता येत नाही. एखादे स्थळ नाकारताना कारण किंवा स्पष्टीकरण द्यायचे नसेल आणि/किंवा त्यातून उद्भवणाऱ्या कटकटींना तोंड द्यायचे नसेल (म्हणजे स्पष्टीकरण दिलेच पाहिजे अशी प्रतिपक्षाची अपेक्षा का असावी? 'तुमच्या स्थळाशी कर्तव्य नाही' एवढे विधान पुरेसे का होऊ नये? पण अनेकदा तसे ते होत नसावे.), तर 'पत्रिका जुळत नाही' हे ठेवणीतले कारण उपयोगी पडू शकते, केवळ या कारणाकरिता पत्रिकेवर अजिबात विश्वास नसला तरी प्रतिपक्षाकडून पत्रिका मागितली जाऊ शकते, तशासारखा हा प्रकार असणे अशक्य नाही.

कारण काहीही असले स्पष्ट नकार केव्हाही चांगला, असे मलाही वाटते.

याबाबत सहमत. किंबहुना नकाराकरिता कारण जाहीर करणे आवश्यक नसावे असे वाटते. नकार मात्र स्पष्ट असावा.

अवांतर: एक हत्ती-मुंगीची गोष्ट आठवते. एकदा मुंगीला हत्तीचे स्थळ सांगून येते. स्थळ मुंगीच्या घरच्या सर्वांना पसंत असते. मुंगी मात्र स्थळाबद्दल नाखूष असते. मात्र कितीही खोदून खोदून विचारले तरी कारण सांगायला तयार नसते.

एवढे चांगले स्थळ हातचे घालवावे लागणार याबद्दल मुंगीच्या घरचे नाराज असतात. शेवटी हिच्या मनात आहे तरी काय, हे जाणून घेण्यासाठी मुंगीला विश्वासात घेऊन तिच्याकडून कारण काढून घेण्याची कामगिरी मुंगीच्या जिवाभावाच्या मैत्रिणीवर येऊन पडते.

त्याप्रमाणे मैत्रीण मुंगीला एकटी गाठून विश्वासात घेऊन म्हणते, "काय ग, एवढे चांगले स्वप्नातल्यासारखे स्थळ चालून आलेले आहे, मुलगा चांगला टॉल, डार्क, हँडसम* आहे, त्याच्यात तुला नेमके काय नाही आवडले? " (* सद्यसंदर्भात या वाक्प्रचाराचे मराठी भाषांतर करणे उचित वाटले नाही. क्षमस्व.)

मुंगी उसासा सोडून म्हणते, "अग बाई, काय सांगू तुला! त्याचे ना, दात पुढे आहेत."

अतिअवांतर: "दात पुढे असणे" हे नापसंतीचे कारण तसे सनातन असावे, परंतु आजच्या जमान्यात ते क्वचित्प्रसंगी "दात पुढे आहेत, त्याने शरीरसंबंधांत अडथळा येऊ शकतो**" इतक्या स्पष्ट शब्दांतही व्यक्त केले जाऊ शकते, असेही ऐकलेले आहे. विवाहाच्या आमंत्रणपत्रिकांमध्ये शरीरसंबंधाचा स्पष्ट उल्लेख असण्याचे सुवर्णयुग बहुधा पुन्हा येऊ घातले असावे अशी पुसटशी शंका आहे. चूभूद्याघ्या.

(** हे*** नेमके कसे घडू शकते ते कळत नाही.)
(*** म्हणजे शरीरसंबंध नव्हे. अडथळा.)