'प्रीएक्झिस्टिंग' म्हणजे (एखाद्या घटनेच्या) आधीपासून अस्तित्वात असलेली एखादी बाब. एखाद्या घटनेच्या संदर्भातील एखादी 'प्रीएक्झिस्टिंग' गोष्ट ही त्या घटनेच्या क्षणी 'एक्झिस्टिंग' असते हे बरोबरच, पण 'प्रीएक्झिस्टिंग' या शब्दात त्या अस्तित्वाचा त्या संदर्भघटनेशी असलेला 'पूर्व'संबंध अधोरेखित होतो.

अमेरिकेत हा शब्द विशेष करून औषधी विम्याच्या ('मेडिकल इन्श्युरन्स'च्या भाषांतराचा हा माझा जाणूनबुजून दुबळा प्रयत्न!) संदर्भात वापरलेला पाहिला आहे. विम्याची योजना लागू होण्याच्या अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या व्याधींना ('प्रीएक्झिस्टिंग कंडिशन्स') अनेक (पण सर्वच नाही) प्रकारच्या योजनांच्या नियमांप्रमाणे योजनेच्या लाभांतून पूर्णपणे वगळले जाते. येथे विम्याची योजना लागू होण्याचा क्षण हा संदर्भबिंदू आहे. त्या क्षणापासून पुढे उद्भवणाऱ्या व्याधींकरिता योजनेचा लाभ मिळेल, मात्र त्या क्षणी अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्याधीकरिता असा लाभ मिळणार नाही, असे 'प्रीएक्झिस्टिंग' या शब्दाच्या वापरातून सुचवले जाते. (योजना लागू होण्याच्या नेमक्या क्षणी उद्भवलेल्या - आणि म्हणून त्या क्षणी अस्तित्वात असलेल्या - व्याधीकरिता लाभ मिळण्यास तत्त्वतः प्रत्यवाय नसावा.)

थोडक्यात, 'एक्झिस्टिंग' आणि 'प्रीएक्झिस्टिंग'मध्ये (एखादी गोष्ट एखाद्या क्षणी) 'अस्तित्वात असणे' विरुद्ध (ती गोष्ट त्या क्षणी) 'अगोदरपासून अस्तित्वात असणे' यांमधील फरक आहे. (दुसरे आणि सहज कळण्यासारखे उदाहरण द्यायचे झाल्यास, एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या नेमक्या क्षणी ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीच्या मातुःश्री दोघेही 'एक्झिस्टिंग' असतात; मात्र ती व्यक्ती केवळ 'एक्झिस्टिंग' असते, तर त्या व्यक्तीच्या मातु:श्री या 'प्रीएक्झिस्टिंग' असतात असे म्हणता येईल.)

('प्रीहीटेड ओवन'मधील) 'प्रीहीटेड'च्या बाबतीतही हेच तत्त्व लागू व्हावे. एखादी पाककृती करायला घेतल्यावर ओवनखरेदीसाठी निघू नका, तर पाककृती करायला घेण्याअगोदरच (१) तो आणून ठेवा, आणि (२) ३५० अं. फॅ./४०० अं. फॅ. /पाककृतीत जे काही दिले असेल त्या तापमानापर्यंत पोहोचेपर्यंत तो तापवून ठेवा असे 'प्रीहीटेड'मधून सुचवायचे असते. येथे पाककृतीची सुरुवात हा संदर्भबिंदू आहे. बहुधा पाककृतीस लागणाऱ्या वेळात ओवन योग्य तापमानापर्यंत तापण्याचा वेळ अंतर्भूत नसावा, आणि/किंवा पदार्थ ओवनमध्ये घालताक्षणी ओवन योग्य तापमानावर नसून त्यानंतर तो हळूहळू तापल्याने पदार्थाच्या शिजण्यावर / शिजणाच्या वेळेवर / शिजलेल्या पदार्थाच्या दर्जावर किंवा चवीवर विपरित परिणाम होत असावा, यांपैकी एका किंवा अनेक कारणांसाठी ही ओवन अगोदरपासून तापवून घेण्याची सूचना असावी असे वाटते, पण खात्री नाही. (चूभूद्याघ्या.)

(स्वगत:काय राव, सकाळीसकाळी खेचून राहिले गरिबाची... )