स्त्रीपुरुष समानतेच्या युगात मुलांच्या पालकांनी अवास्तव अपेक्षा करू नये हे जितके खरे तेवढेच मुलीनेही नवरा म्हणून अपेक्षित मुलगा आपल्यापेक्षा सर्वच बाबतीत वरचढ असायलाच हवा अशी अपेक्षा बाळगणे कितपत योग्य ?
ज्याप्रमाणे मुलींना वरचढ नवरा हवा असतो त्याप्रमाणे मुलांना आणि त्याच्या घरातल्यांनाही "नाकापेक्षा मोती जड" नको असतो. आता मुली शिकल्या, उच्च पदस्थ नोकऱ्या करू लागल्या तेव्हा हे इतक्यावरच थांबणार नाही - नवरा बायकोतील भांडणे वाढतील, डिवोर्स वाढतील, स्वतंत्र कुटुंबे वाढतील आणि मॉल संस्कृतीही वाढेल. याला रोखणे अशक्य असावे.
आजही उच्चशिक्षित, मोठ्या पदांवर जबाबदाऱ्यांच्या नोकऱ्या सांभाळणाऱ्या पोरांना जोडीदार मात्र ठरवून, आईबापांच्या, नातेवाईकांच्या मध्यस्थीने हवा असतो. त्यात चुकीचे काही नाही पण मग बघून, सवरून, ठरवून लग्न करायचेच झाले तर या सर्व गोष्टी यायच्याच. मुलींचा चॉईस अर्थातच वाढलेला आहे आणि मनासारखा नवरा नाही मिळाला तर एकट्याने राहण्याची तयारीही आहे.
आमच्या एक नातेवाईक आहेत. त्यांना पुढले-मागली असे लग्नालायक मुलगा आणि मुलगी दोन्ही आहेत. मुलासाठी मुलगी बघायला गेल्या की "काय बाई! अगोचर मुलगी होती. पहिल्या भेटीतच पगारापासून, लग्नानंतर कुठे राहणार वगैरे प्रश्न विचारत होती. " आणि मुलीसाठी मुलगा बघायला गेल्या की मुलीला पढवतात, "सर्व काही विचारून घे हो. आधीच सगळं क्लिअर करून घेतलेलं बरं असतं! नंतर झेंगट नको. "
बायदवे,
लग्नापूर्वीच स्वतःचा फ्लॅट असणारा शिवाय घरात सर्व सुखसोयीची साधने ( म्ह. टी. व्ही., फ्रीझ, इ. ) उपलब्ध असणारा असा हवा असतो.
टिव्ही, फ्रीज ही सुखसोयीची साधने ८० च्या दशकांत असावीत. आता त्या गरजा आहेत. एखाद्याने आमच्या घरात टिव्ही, फ्रीज ही सुखसोयीची साधने आहेत हं! असे सांगितल्यास - कोणीतरी भिक्कारडा दिसतो* असे म्हणून एखादी मुलगी स्थळ नाकारण्याचा संभव आहे.
* यात कोणाचा अपमान करण्याचा हेतू नाही.