टिव्हीवर निबंध लिहायचा मानस नव्हता पण विचारले म्हणून हा अवांतर प्रतिसाद देत आहे.

टिव्हीप्रमाणेच फोन देखील गरजेचे साधन नाही असे मानणाऱ्या काही व्यक्ती मिळतील परंतु अशांची संख्या फार कमी आहे. सर्वसामान्य माणूस घरात एक तरी टिव्ही ठेवून असतोच. (इथे लग्नाला इच्छुक, शिकलेल्या, कमावत्या मुला-मुलींचा आणि कुटुंबांचा विचार चालला आहे. दारिद्र्य रेषेखालील जनता वगैरे बाजूला ठेवूया. ) ज्याप्रमाणे कंप्युटर ही गरज आहे त्याच प्रमाणे अनेकांची टिव्ही ही गरज आहे. थकलेल्या, शिणलेल्या शरीराला आणि मनाला दोन घटका विरंगुळा देण्याचे टिव्ही हे आजही प्रभावी साधन आहे आणि मुख्यत्वे कुटुंबाने एकत्र बसून मनोरंजन करण्याचेही. लग्नापूर्वी कोणाला कोणती गरज असते हे त्या व्यक्तिवर अवलंबून आहे. टिव्ही असणारी घरे मोजली तर आपल्या विधानातील फोलपणा लक्षात येईल. चित्रपट, रडव्या सिरिअल्स आणि रिमिक्स गाणी यांपासून जगभरातील बातम्या, खेळ, माहिती, विज्ञान वगैरे सर्व गोष्टी एकवटतील असे साधन टिव्हीचे.

पूर्वी एकत्र कुटुंबे असत, मनोरंजनासाठी गावगप्पांपासून खेळ खेळण्यापर्यंत घरातली माणसे पुरेशी असत. आताच्या न्यूक्लिअर कुटुंबांमध्ये ही उणीव टिव्ही भरून काढतो आणि केवळ मनोरंजनासाठीच टिव्ही आहे असे म्हणणे चूक आहे. इंटरनेट खालोखाल जगाशी तुम्हाला बांधून ठेवणारे, बातम्या पुरवणारे टिव्ही हे एक प्रभावी दृकश्राव्य माध्यम आहे. टिव्हीचे याहूनही अधिक उपयोग आपल्या कक्षा रुंदावल्या तर कळून येईल. मुंबई-पुण्यात असा वापर होत असेलच असे सांगता येणार नाही परंतु रोजचे हवामान, शाळांचा सुरळीतपणा, रहदारी वगैरे वगैरे यांची बित्तंबातमी देणारे टिव्ही हे परदेशातील मुख्य साधन आहे.

पूर्वी इलेक्शनच्या काळात टिव्हीवर दिवसभर चित्रपट दाखवत, जेणेकरून लोक घरात राहतील आणि बाहेर दंगे वगैरे होणार नाहीत. म्हणजेच मनोरंजनाबरोबर बहुधा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीही टिव्हीचा उपयोग होत असावा.  (हे जरा अतिच झाले तरीही!)

गरजेच्या गोष्टी घेता येतात पण त्या घेतल्या नसतील तर एखादा तुमच्या राहणीमानाची किंमत त्यावरून करू शकतो. टिव्ही, फ्रीज सोडून द्या किंवा गणलेत तरी आज तुमच्याकडे कोणते "मॉडेल" आहे ही गोष्ट अधिक महत्त्वाची वाटणारी तरुण मंडळी आज आहेत. मध्यंतरी वाचले की मोबाईल असणे यांत काही मोठी गोष्ट नाही परंतु मोबाईलच्या मॉडेलवरून आज तुमची ऐपत ठरवली जाते.

टिव्ही आहे तर फ्लॅट स्क्रीन का नाही, मोबाईल आहे  पण तो जुना का? आयफोन का नाही? फ्रीज दोन-तीन दारांचा का नाही? गाडी प्रशस्त मोठी का नाही? अशा अनेक गोष्टींचा विचार करून लोक तुमची ऐपत ठरवत असतात.