टोपणनावांचेही अनेक पदरी उपयोग असतात! त्यामुळे प्रत्यक्ष जगात तुम्ही कोणत्याही नावाने वावरत असा, प्रौढत्वाला मिरवत असा.... ज्याप्रमाणे होळीला तोंडावर मुखवटे लावलेली पोरे मनसोक्त दंगा करतात, त्याचप्रमाणे टोपणनाव घेतल्यावर त्या नावाचा मुखवटा धारण करून नामधारी व्यक्तीला यथेच्छ जालीय दंगा करता येत असावा! बरे, कुटुंबीय, सहकारी, बॉस, परिचित इत्यादींनी टोकायचीही मग भीती नाही. आपणच एरवी आपल्या व्यक्तित्वाला एका चौकटीत कोंबतो/ ढकलतो/ साचेबद्ध करतो --- तसे करणे नाही! समाजात वावरतानाही माणूस एक ''गोषा'' घेऊन वावरतच असतो की.... कधी जातीचा, कधी हुद्द्याचा, कधी नैतिकतेचा, कधी धार्मिकतेचा, कधी तथाकथित धर्मनिरपेक्षतेचा तर कधी आपणच बरोबर असण्याचा! ह्या बुरख्याआडदेखील त्याचा जीव घुसमटत नसेल? त्याच्यातल्या ''माणूस''पणाला ग्रहण लागत नसेल? पण तिथे त्याला कळत नकळत, मनाविरुद्ध तडजोड करावीच लागते.
मग मोकळेपणाने ''बागडायचे'' कुठे? स्वच्छंद भटकंती कोठे करायची? इब्लिसपणाला मोकळी हवा कुठे द्यायची? शहराच्या काडेपेट्यांच्या घरांत आणि टिचकीभर मैदानात तर मोकळा श्वासपण घेता येत नाही. मग आंतरजालीय मैदानात माणसे आखाडे रचतात. कोणी अजून वेगळे गोषे धारण करतात तर कोणी मोकळा श्वास घेता यावा म्हणून इकडून तिकडे भटकत राहतात. ह्या प्रवासाला अजून रंजक बनवण्यासाठी मग चित्रविचित्र टोपणनावांचा खेळ रचला जातो. कधी ही टोपणनावे अशीच टाईमपास असतात किंवा कधी गुणदर्शक किंवा कधी मनातली आवड व्यक्त करणारी.
कोणी आवडत्या पदार्थाचे/ अभिनेत्याचे/ व्यक्तीचे/फुलाचे नाव घेते.... कोणी आवडत्या स्थळाचे, कोणी स्वतःतील आवडत्या गुणालाच टोपणनाव बनवते तर कोणी ''दुर्गुणा''चे नावही घ्यायला मागेपुढे पाहत नाही. त्यात फार ''सीरियस'' असे काही नसते. आरशातल्या आपल्या प्रतिबिंबाला लहानपणी आपण जाता येता जसे वेडावून दाखवायचो, तसेच काहीसे!!!
अर्थात हे सर्व माझे वैयक्तिक मत आहे. लोकांचे टोपणनाव घेण्यामागे अजून काही व्यावहारिक/ अर्थपूर्ण दृष्टीकोनही असू शकतील. उदा. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला जर कोणालाही आपली ओळख न कळू देता लेखन करावयाचे असेल तर ती नक्कीच टोपणनाव वापरणार! असो. अजून इतरांचे दृष्टीकोनही जाणून घेण्यास आवडेल!!