संगणक बंद केला की जालावरची खळबळ संपली एवढे सोपे आहे. त्यामुळे कोणत्याही टोपणनावाने काहीही खळबळजनक लिहिले तरी फार फरक पडतो असे मला वाटत नाही. एक दोन दिवस तो धागा सुरू राहतो. थोडेफार आत्यंतिक समाधान मिळते . बास्स.  अगदी जालावर पेपर आहेत म्हणून त्यात आपले मत दिले तरी फार फरक पडतो असे नाही.  ज्यांना त्या विषयात रस आहे, जी व्यक्ती त्याच्याशी संबंधित आहे तिला चार पाच दिवस त्रास होतो.  अखेर साध्य काय होते?

अनेक मराठी साईटस , मराठी ब्लॉगवर एव ढे लेखन होत असते की त्यातून अनेक जीए , मेघना पेठे, नेमाडे, राजाध्यक्ष , सुरेश भट निर्माण व्हावे....गेल्या दहा वर्षात दहा तरी साहित्यिक या नेटावरच्या  लिहिण्याने  जन्माला यायला हवे होते. मुद्रित माध्यमात स्थिर व्हायला हवे होते.   आजच्या घडीला जालावर ५००जण लिहिते असतील तर त्यातून १५ सुद्धा मुद्रित माध्यमात कायमचा ठसा उमटवू शकतील असे नाहीत ही वस्तूस्थिती आहे.   हा आकडा वाढणार नाही असे नाही  आणि वाढला तर मला आनंदच होईल. इंटरनेटच्या नावाने कितीही जल्लोश केला तरी ही एक बंदिस्त चौकट आहे हे नक्की. अंगात एवढी धमक आहे , वेळ आहे आणि उत्साह आहे तर ह्याच चौकटीतल्या खळबळीत धन्यता मानायची की आणखी काही करायचे हा प्रश्न प्रत्येकाने सोडवावा.

जालावरची सगळी नावे कोणीतरी 'एक दोन तीन' असे बिल्ले घालून वावरणारी माणसे आहेत , एक बिल्ला विडंबनाला, एक गद्य लेखनाला, एक कवितेला इत्यादी बिल्ले एकाच व्यक्तीने घेतले आहेत असे जरी वाटले तरी काय फरक पडेल?तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे . प्रशासन आहेच  - काय इथे चालेल  आणि कसे चालावे ते बघण्याकरता.
आता ही नावे कोणाजवळ उघड करावी ते दोन व्यक्तीमधले नाते कसे आहे त्यावर अवलंबून आहे.  

लपून छपून हल्ला करायचा किंवा कसे हा निर्णय प्रत्येकाचा आहे. हा हल्ला व्यक्ती वर आहे की लेखनावर ते सुद्धा महत्त्वाचे आहेच.  माझ्या लेखनावर येणारी टीका कोणत्याही नावाने आली तरी लेखनापर्यंत सिमीत राहत असेल तर मी कधीच तक्रार करणार नाही. या नावाने का सांगितले स्वतःचे नाव का नाही वापरले? असे मनात आले तरी मी तो विचार दूर सारते.  माझ्या लेखानातल्या चुका दाखवण्याकरता अनेक टोपणनावांनी हातभार लावला आहे. थोडा राग आला तरी टीकेकडे बघण्याच्या माझ्या दृष्टीकोनामुळे माझे लेखन बदलले आहे.
माझ्या मतांवर टीका झाली तरी चालेल पण जेव्हा कौटुंबिक / घरातल्या बाबी खिल्ली उडवण्याचा सूर घेऊन येतात तेव्हा खेद वाटतो.  ते सुद्धा झाले. थोड्याफार प्रमाणात असे चालणारच ..
अनेकजण इथे फक्त टाइमपास करायला येतात. ( मी तसे येत नाही) नोकरी घर सगळीकडचा ताण काढण्याचे एक साधन म्हणजे मराठी जाला वरचा वावर असे सुद्धा काही मानतात. प्रत्येकजण स्वतंत्र आहे.. पण  कोणत्याही  माणसाच्या वागणुकीचा त्रास  करून घेणार नाही ही स्थिती मला लगेच मिळवता आली नाही , त्याकरता वेळ जावा लागला , प्रयत्न करावा लागला.  पण ते शक्य आहे एवढेच सांगू शकते. 

प्रतिसाद देतांना लेखन करतांना अनुभूतीशी प्रामाणिक राहीन असे मी ठरवून वावरते.
एखादी व्यक्ती मागे  मला असे म्हणाली  होती का ..बघतेच असा अभिनिवेष आला की मग काही खर नाही.  माणसाला संबंध तुटतील याची  भीती मनात असते. खर सांगता येत नाही म्हणून टोपणनाव घेतले जाते . पण जे संबंध स्पष्ट बोलून तुटतात ते कशासाठी टिकवायचे?
माणसे सुद्धा कायम तशीच आडमुठी थोडी असतात ?  वय वाढत, अनुभव वाढतो ..थोडा काळ गेला की कळत की व्यक्ती बदलली आहे, मते बदलली आहेत. पुन्हा सं बंध चांगले होऊ शकतात, गैरसमज दूर होऊ शकतो. 
असो माझे इथे एकापेक्षा जास्त आयडी आहेत म्हणून प्रतिसाद द्यावा असे वाटले. अन्यथा आज फार वेळ चर्चेत गेला आहे:)