खरं तर माझे हे मनोगत समाज या कॅटेगरी मध्ये बघून तुम्हाला जरा नवलच वाटेल. पण तरीही ते वाचल्यावर कदाचित तुमचे मत बदलू शकेल.
आपल्या या समाजातल्याच एका वल्ली विषयी मी माझे मनोगत व्यक्त करून मनोगतवरच्या माझ्या लेखनाच्या प्रवासाला सुरुवात करतोय.
प्रथमच लेखन करत असल्याने त्रुटी आढळल्यास त्यावरच थांबून न राहता पुढील वाचन करावे ही नम्र विनंती नाहीतर तुमचाच वेळ जाईल .
माझ्या आयुष्यात मी आजवर अनेक जणांशी मैत्री केली. पण खऱ्या अर्थाने मित्र म्हणण्याच्या लायकीचे खूपच कमी लोक भेटले.
त्यातलाच एक म्हणजे भूषण.
भूषण, माझा लहानपणापासूनचा मित्र. भूषण आणि मी पाचवीमध्ये शाळेच्या रिक्शात एकत्र होतो तेव्हापासूनच आमची चांगली गट्टी जमली. त्याच्यामुळे अनेक चांगल्या सवयी मला लागल्या उदा. संघाच्या शाखेत जाणे, जश्यांस तसे वागणे किंवा हजरजबाबीपणा वगैरे. सुट्टीमध्ये पतंग उडवताना, सायकलवर लांब फिरायला जाताना, आणि दिवाळीत किल्ला करताना आम्ही कधी जीवाभावाचे मित्र झालो ते कळलंच नाही. ते दिवस आठवले की आजही पुन्हा तसंआयुष्य जगण्याचा मोह आवरत नाही. असो. भुषणला पहिल्यांदा भेटल्यावर तो खूपच उद्धट किंवा स्पष्ट बोलणारा आहे हेच सर्वांचे मत पडते. माझेही होते, पण ते बदलायला वेळ लागत नाही हेही तितकंच खरं. आणि काहीजणांचे हेच मत आयुष्यभर राहील हे तर अगदी शंभर टक्के खरं.
माझा हा मित्र माझ्या प्रत्येक आनंद आणि दुखा:त अगदी आवर्जून माझ्याबरोबर होता, आहे आणि असेलच. त्यामुळे त्याच्या असण्याची सवयच मला झालिये आता. बऱ्याच वेळेला मला त्याच्या सडेतोड किंवा थोड्या उद्धट वागण्याचा भयंकर राग येतो.(तसा सगळ्यांनाच येतो ) पण नंतर त्याच्या त्या वागण्याचे कारण कळले की मला माझाच राग येतो.आणि हल्ली हे बऱ्याचदा घडते. माझा कोणताही प्रॉब्लेम असो किंवा एखादी आनंदाची बातमी ते पहिल्यांदाभूषणलाच कळणार. माझ्या आयुष्यातल्या सर्वात वाईट प्रसंगांमध्ये मला त्याचा खूप आधार मिळाला. माझ्या आयुष्याची भरकटलेली गाडी त्याच्यामुळेच परत रुळावर आली. (ती एक मोठी गोष्ट आहे,सांगीन केव्हातरी सवडीनं.) तर असा हा माझा जीवाभावाचा मित्र भूषण ! मी त्याला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो हा माझा अनेक वर्षांचा समज त्याने गेल्या काही दिवसात नकळतपणे चुकीचा ठरवलाय. विशेषतः त्याचे मनोगत वरचे लेख वाचल्यावर तर माझं हे मत अगदी पक्कं झालंय .
त्याच्यात अचानक झालेल्या या बदलाने मला खडबडून जाग केलं आहे आणि त्याच्याविषयी लिहिण्यास प्रवृत्तही. त्याच्यातला एक उत्तम लेखक आणि समाजासाठी खरंच काहीतरी करण्याची त्याची इच्छा आणि त्याची धडपड मी आजवर ओळखू शकलो नाही याच मला खूप आश्चर्य वाटतंय. मी त्याला समजण्याचा प्रयत्न चालू ठेवतोचे. पण तुम्हाला जर काही कळलं तर मला नक्की सांगा. आणि हो शक्य असल्यास थोडा वेळ समाजाला द्या आणि त्यातून काहीतरी चांगले केल्याचा आनंद मिळवा अस तो नेहमी सांगतो त्याचाही अवलंब करा. इथे मनोगत वर लोक त्याला धेयवेडा म्हणून ओळखतात.आणि तो खरंच अगदी तस्साच आहे हे तुम्हाला कळेलच त्याला भेटल्यावर. बाकी बऱ्याच गोष्टी आहेत मनोगत वर लिहिण्याच्या यादीत पण आत्ता इथेच थांबतो. टिचकी मारून प्रतिसाद द्या आणि माझ्या या लेखावरचे आपले मनोगत नोंदवा. आपला प्रतिसाद माझ्या पुढील लेखनासाठी खताचे काम करेल. तेव्हा भरभरून प्रतिसाद द्या.