आपले मुद्दे बरेचसे पटण्यासारखे असले तरी त्यात विनाकारण आगपाखड केली आहे व अनेक गैरसमजांचे भरताड आहे असे प्रथमदर्शनी जाणवते. माझ्या कुवतीप्रमाणे काही मुद्यांचा परामर्ष घेण्याचा हा प्रयत्न.
१. 'मनोगत' वरच सध्या हा विषय चर्चेस आहे. तो म्हण्जे 'मुलींच्या अपेक्षा ' ही चर्चा. मुलिंप्रमाणेच मुलगे ही अनेक फालतू कारण सांगून लग्नाला नकार देतात तरीही मुलीच टीकेचे लक्ष्य का??
आपण पूर्ण चर्चा काळजीपूर्वक वाचली तर फालतू कारणे सांगून नकार देणाऱ्या मुलामुलींवर (कोणताही आपपरभाव न ठेवता) बहुतेक सदस्यांनी मनसोक्त तोंडसुख घेतले आहे.
मला तर याचे कारण असे वाटते की या पुरुषप्रधान समाजात पुरुषांना 'नकार'
ऐकायची सवय नाही. आणि एका मुलीने त्यांना नकार देणे हे त्यांना खुपच
अपमानास्पद वाटत असावे. त्यामुळे स्वतःच्या गुणा अवगुणांचा विचार न करता
सरधोपटपणे त्यांनी उपवर मुलीं बद्दल जाहीररीत्या टीका सत्र सुरू केलेले
दिसते.
हा चर्चा वाचून किंवा न वाचता आपण काढलेला चुकीचा निष्कर्ष आहे. यात भाग घेणाऱ्या बहुतेक सदस्यांचे विवाह झाले आहेत/ असावेत. ( हा या सदस्यांच्या पूर्वीच्या लेखनावरुन व प्रतिसादांवरुन काढलेला निष्कर्ष आहे.) त्यामुळे एखाद्या मुलीने या सदस्यांना 'सध्या' नकार दिल्यामुळे अपमान वाटून त्यांनी सरधोपटपणे उपवर मुलींवर जाहीररीत्या टीकासत्र सुरु केलेले आहे असे नाही. कुशाग्र यांनी आजकाल विवाह जमवताना काय अडचणी येतात व त्यांचे निराकरण कसे करता येईल असा साधासोपा प्रस्ताव मांडला आहे. मुले अर्थातच मुलांची बाजू मांडतील व मुली मुलींची बाजू मांडतील जेणेकरुन दोन्ही बाजू समजावून घेऊन अडचणींचा गोषवारा मांडणे सोपे जाईल.
मुलीची पात्रता आहे किंवा नाही, तसेच तिला याहून चांगले
(मनाप्रमाणे ) स्थळ मिळेल किंवा नाही याची उठाठेव इतरांनी का करावी? तिला
हवे असेल तर करेल ती लग्न नाहीतर राहील लग्नाशिवाय. तिने तडजोड केलीच
पाहिजे हा आग्रह का ? आणि अर्थातच असा आग्रह धरणारे तुम्ही कोण ??
मनोगताचा उद्देश वाचावाः आपल्या सोयीसाठी पुन्हा देत आहे
ज्यांना मराठीत लिहिण्याबोलण्याची आवड आणि इच्छा आहे त्यांना मराठीतून आपले विचार
व्यक्त करण्यासाठी, इतरांच्या लिखाणावर सूचना, अभिप्राय, टीका टिप्पणी करण्यासाठी,
आजूबाजूला चाललेल्या घटनांवर आपली मते मराठीतून व्यक्त करण्यासाठी हे संकेतस्थळ
उपलब्ध करून देण्याचा आमचा हेतू आहे. आपणा सर्वांचे येथे स्वागत आहे.
या उद्देशातील ठळक केलेल्या मुद्द्यावरच आपण सर्वजण चर्चा करत आहोत. शिवाय श्री. टग्या यांच्या प्रतिसादातील काही शब्द व अतिअवांतर प्रतिसादातील (प्रीएक्झिस्टिंग व तत्सम) इंग्रेजी शब्द वगळता बहुतेक मते मराठीतूनच व्यक्त झाली आहेत. त्यामुळे आम्ही कोण, व आम्हाला अशी मते व्यक्त करायचा अधिकार काय हा प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे काय याबाबत शंका उत्पन्न करावीशी वाटते.
२.
नोकरी करणाऱ्या स्त्रिया घराकडे नीट लक्ष देत नाहीत. ही अशी टीका तर
प्रत्येक नोकरी करणाऱ्या स्त्रिला ज्याचा तिच्या संसाराशी काहीही संबध
नाही त्याच्या कडुनही ऐकून घ्यावी लागते.
हा मुद्दा बाकी बिनतोड आहे. माझ्या आईने नोकरी करुनच तिचा संसार केला व आम्हाला सांभाळले मात्र कदाचित घराकडे नीट लक्ष देता न आल्याने (अशा टीका इतरेजनांकडून होत असतच) माझ्यासारखे उपद्व्यापी कार्टे या जगाला झेलावे लागत आहे.
३. उलटपक्षी घरी
बसणाऱ्या बायका काय नवऱ्याच्या जीवावार ऐश करतात. घरातच तर बसून असतात
नुसत्या काय काम असते यांना अशी टीका घरी बसणाऱ्या बायकांना सहन करावी
लागते. शिवाय त्यातून घरी बसणारी स्त्री उच्चशिक्षित असेल तर विचारायलाच
नको. एव्हढे शिक्षण घेउन पण घरीच बसली आहे असे टोमणे सतत ऐकावे लागतात.
सुशिक्षित असूनही (लग्नानंतर किंवा लग्नापूर्वी) घरी बसणाऱ्या बायका व
त्याच श्रेणीतले घरी बसलेले पुरुष या दोहोंमध्ये कोणाच्या वाट्याला अधिक
टीका येत असेल असे आपणास वाटते? माझा कौल पुरुषांच्या बाजूने आहे.
४.
बायकांना गाडी चालवता येत नाही, ही अजून एक अतिशय हस्यास्पद अशी टीका. तसे
बघता सर्व अपघाताच्या बातम्यांमध्ये चालक हा बहुतेक करून पुरुषच असतो
तरीही.
माझ्याकडे विदा उपलब्ध नसला तरी आजूबाजूला पाहता बहुतेक गाड्यांचे चालक पुरुषच असल्याने अपघाताच्या बातम्यांमध्ये चालक हा पुरुषच असणे स्वाभाविक आहे. अर्थात अपघाताचे कारण पुरुषच असेल की नाही हा वादाचा (व वेगळ्या चर्चेचा) मुद्दा होऊ शकतो. मला स्वतःला गाडी चालवता येत नाही. व माझ्या ओळखीच्या बऱ्याच मुलींना चांगली गाडी चालवता येते, त्यावरुन माझ्यावरही हास्यास्पद टीका झाली आहे. पुण्यातल्या ट्राफिकमध्ये मला दुचाकी चालवायलाही भीती वाटते त्यालाही लोक हसतात. पण हसतील त्याचे दात दिसतील एवढे लक्षात ठेवून वागले की आपल्याला काही फरक पडत नाही.
५. अता अजून एक अतिशय संवेदन्शील विषय. लिहावे का नाही असा
विचार करत होते पण लिहुनच टाकते. हल्ली बलात्काराच्या बऱ्याच बातम्या
येतात. अशा वेळी सुद्धा पुरुषाचा गुन्हा उघड दिसत असुनही, मुलीचीच काही
चुक आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. जसे की ती एकटीच कशाला हिंडत
होती? असे कपडे का घातले होते? ई. अनेक.अशाप्रकारे काहीही केले तरी
स्त्रियांच्या वाट्याला समाजाकडून केवळ टीकाच येत असते.
अशा घटनांमध्ये स्त्रीयांवर होणाऱ्या टीका पूर्णपणे चुकीच्या आहेत. पुणे हे पूर्वी वाटते तितके सुरक्षित राहिलेले नाही हे रोजच्या बातम्या वाटून समजतेच. मात्र स्वसंरक्षणासाठी स्त्रीया व पुरुष यांनी काही प्राथमिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. लिफ्ट मागितलेल्या महिलेवर झालेल्या बलात्काराची घटना पाहिल्यास, त्या गाडीला काळ्या काचा होत्या. अशा प्रकारच्या गाड्यांमध्ये झालेल्या (पुरुषांची लूटमार व हत्या) गुन्ह्यांची संख्या फार जास्त आहे. शिवाय त्या गाडीत आधीच तीन पुरुष बसलेले होते. अशा प्रसंगी त्या स्त्रीने लिफ्ट न घेणे तिच्या सुरक्षिततेसाठी योग्य ठरले असते. अर्थात या दुर्दैवी घटनेत स्त्रीचा काहीही दोष नाही.
पुरुषाना मात्र
कोणीही असे फारसे जज करताना दिसत नाही. भले मग ते अशिक्षित समाजातले
व्यसनाच्या आहारी गेलेले पुरुष असो, बायकोला मारहाण करणारे असो किंवा
सुशिक्षित समाजातील घरात अजीबात काम न करणारे पुरुष असो. पुरुष असे
वागणारच हे गृहीत धरले जाते आणि एखादा जर हे सर्व करत नसेल तर त्याचे
कौतुक केले जाते. ही विषमता आपल्या समाजात आहे हेच खरे.
हे निरीक्षण पूर्णपणे चुकीचे आहे. अशिक्षित किंवा सुशिक्षित समाजातील व्यसनाच्या आहारी गेलेल्या पुरुषांना त्या समाजात काय किंमत राहते हे आपण जवळून पाहिले आहे काय? किंबहुना अशा पुरुषांच्या बायका या दिवट्या नवऱ्यांना सांभाळूनही स्वतःचा संसार कष्टाने व नेटाने चालवतात याचे किती कौतुक होते याची आपणास जाणीव नसावी.