मला वाटते की व्यक्ती तितक्या प्रकृती या नियमानुसार कोणी कसे बोलावे याबद्दल सरसकट कुठलेच ठोकताळे देता येणे अवघड असते. उत्तर एकच असले तरी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्याचा बरोबर-चूकपणा व्यक्तीसापेक्ष बदलणे साहजिक वाटते. जसे की -
नोकरी करणाऱ्या स्त्रिया घराकडे नीट लक्ष देत नाहीत. - हा टोमणा अगदी चपखल लागू होईल अशाही अती-करीअरीस्टीक (इतक्या की स्वतःचे बाळ आजारी पडले तरी सुट्टी न घेता ऑफिसला तर येणारच पण काळजीदाखल एक साधा फोनही करून बाळाकडे लक्ष द्यायला घरी राहिलेल्या नवऱ्याला विचारणार नाहीत की आता कसंय बाळ! ) स्त्रिया मी पाहिल्या आहेत आणि हा टोमणा निखालस खोटा पाडणाऱ्या नोकरी चपखलपणे करून घरातल्याही सग्गळ्या जबाबदाऱ्या अगदी चोख पार पाडणाऱ्या (अगदी लाईट बील भरण्यापासून ते किराणा आणण्यापर्यंत, दुखणे-खुपणे बघण्यापासून ते सणसमारंभांपर्यंत वगैरे सगळे) स्त्रियाही मी पाहिलेल्या आहेत. आता यातली पहिल्या वर्गात मोडणारी स्त्री ज्या व्यक्तीच्या बघण्यात असेल त्या व्यक्तीने जर वरचा टोमणा मारला तर त्यात अयोग्य ते काय आहे? पण हाच टोमणा जर दुसऱ्या वर्गातल्या स्त्रीला ओळखणाऱ्या व्यक्तीच्या कानावर पडला तर त्या व्यक्तीच्या तळपायाची आग मस्तकात जाणे हेही तितकेच साहजिक आहे.
घरी बसणाऱ्या बायका नवऱ्याच्या जीवावर ऐश करतात. - ह्याही टोमण्याचे तसेच. काही मुलांच्या अपेक्षा असतात की त्यांना नोकरी करणारी बायको हवी असते. आता लग्न जमावे म्हणून तेवढ्यापुरते हो म्हणायचे आणि नंतर घरीच बसायचे असे मुलीने केल्यास हा टोमणा येणारच की. तेच काही मुलांना घरच संभाळणारी बायको हवी असते पण मित्रांमध्ये (ज्यांच्या बायका नोकऱ्या करतायत) गेल्यावर तसे कबलायची इच्छा नसल्यास वरचा टोमणा अगदी हाताशीच असतो. काही प्रकरणं तर अशीही पाहिली आहेत की ज्यात लग्नाच्या वेळी फक्त घराकडे लक्ष देणारी आणि नोकरी न करणारी बायको हवी होती पण नंतर जसजशा जबाबदाऱ्या वाढत गेल्या तसतशी तिनेही नोकरी करायला हवी असा धोसरा सुरू झाला.. ती तिच्या स्वभावाला धरून या बदलाला तयार झाली नाही आणि वरचा टोमणा वरच्यावर आमच्या कानी पडायला लागला!
वरच्या दोन उदाहरणांमधून मला एकच म्हणायचे आहे की जोवर आपण त्या टोमण्यामागचे संयुक्तीक संदर्भ देत नाही तोवर त्या-त्या टोमण्यांबद्दल प्रत्येकात मतमतांतरे होणे हे जवळपास अटळच.
स्त्री आहे की पुरूष आहे की तिसरंच कोणी आहे, केवळ यावरून कुठल्याही गोष्टीचा चूक-बरोबरपणा ठरवणे सर्वस्वी चुकीचे होईल.