शिवसेनट हा शब्द आवडला. रूढ व्हायला काहीच हरकत नाही. पूर्वी संघिष्ट शब्द होता, अजूनही असेल. एखादा भाजपाच्या मागे लागला की त्याला कच्छपीच्या धर्तीवर भाजपी लागला असे म्हणायला हरकत नाही. 'काँग्रेसवासी' झाला प्रचलित आहेच.  मनसेनेच्या जातीच्या लोकांना मानसेनीय म्हणावे. पूर्वी राष्ट्रीय काँग्रेसचे विभाजन होऊन  रेड्डींची रेड्डी कोंग्रेस आणि चव्हाणांची चड्डी काँग्रेस होती.
आचार्य अत्रेंनंतर  औपरोधिक टोपणनावे ठेवण्याची त्यांची क्षमता कुणात उरली नसल्याने, अशा नावांची निर्मिती थांबल्यातच जमा आहे. मग्रूरजी कसाई, नर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री, न. र. कीटक, वानरोबा भावे आणि अशी अनेक टोपणनावे अत्र्यांनी  वापरली. 
जनता ज्यांना  टोपणनावांनी(च) ओळखते असे बालगंधर्व, सवाई गंधर्व, नूतन गंधर्व, छोटा गंधर्व, कुमार गंधर्व आणि आता आनंद गंधर्व. वर्तमानपत्रांचे संपादक : भालाकार, काळकर्ते(शिम परांजपे),दर्पदर्पणकर्ते(दामोदरपंत चिपळूणकर),  प्रबोधनकार(केसी ठाकरे),  लोकशिक्षणकार ( बाळशास्त्री जांभेकर), ग्रंथकर्ते : रियासतकार(गोस सरदेसाई), ज्ञानकोशकार(श्रीव्यं केतकर), सर्व संग्रहकार(माचं डुकले), नवनीतकार(पब गोडबोले), पंचकोशकार(रभा गोडबोले), व्याकरणकार पंडित चतुष्टय(जगन्‍नाथशास्त्री क्रमवंत, रामचंद्रशास्त्री जान्हवेकर, बाळशास्त्री घगवे, व गंगाधरशास्त्री फडके), तर्कतीर्थ(लक्ष्मणशास्त्री जोशी), नाट्यछटाकार(दिवाकर), बालकवी(ठोंबरे). शिवाय लोकमान्य, लोकनायक(माश्री ऊर्फ बापूजी अणे/जयप्रकाश नारायण), लोकशाहीर(अण्णा भाऊ साठे), लोककवी (मनमोहन नातू), लोकसखा, लोकहितवादी(गोह देशमुख),  शिवशाहीर(बाबासाहेब पुरंदरे),  आचार्य(मोवा दोंदे, प्रके अत्रे, लिमये, विनोबा भावे, कृपलानी, शंद जावडेकर), नाट्याचार्य(कृप्र खाडिलकर), महात्मा(मोक गांधी/जोतिबा फुले), महामहोपाध्याय(पांवा काणे/दवा पोतदार), पंडित(महादेवशास्त्री जोशी), संगीतकलानिधी मास्तर(कृष्णराव फुलंब्रीकर), स्वरभास्कर (भीमसेन जोशी), गानकोकिळा(हिराबाई बडोदेकर), गानसरस्वती(किशोरी आमोणकर), राजकवी(चंद्रशेखर), महाराष्ट्र-भाषाभूषण(जर आजगांवकर), कविकुलभूषण(कालिदास), केरळकोकिळकार महाराष्ट्रभाषाचित्रमयूर(कृना आठल्ये), सरदार(पटेल, पुरंदरे, मुजुमदार, मुदलीयार, रास्ते, नातू, पटवर्धन), वीर(वामन गोपाळ जोशी), स्वातंत्र्यवीर,  नरवीर(तानाजी), धर्मवीर(संभाजी), महर्षी (अण्णासाहेब कर्वे), सार्वजनिक काका(वाग जोशी), आहिताग्‍नि (राजवाडे), पट्ठे(बापूराव), समर्थ, स्वामीसमर्थ, स्वामी(दयानंद सरस्वती), महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, सेनापती(बापट), साहित्यसम्राट(नचिं केळकर), बापूजी (अणे), झुणका भाकर फेम समतानंद(अनंत हरी गद्रे), राशीचक्रकार(शरद उपाध्ये), होरारत्‍न, अश्लीलमार्तंड(कृष्णराव मराठे),  चित्रपती(शांताराम वणकुद्रे), गुरुवर्य(रविंद्रनाथ ठाकुर), गुरवर्य(बाबूराव जगताप), सहकारमहर्षी(विखे पाटील?), संपसम्राट(जॉर्ज फ़र्नांन्डिस)   इ. इ. महाराष्ट्रात जनतेने दिलेली टोपणनावे अगणित आहेत.
--अद्वैतुल्लाखान