अधोरेखित अपेक्षा या अवास्तव किंवा अवाजवी वाटणे हे समजण्यासारखे आहे. अनेकदा अनेक (पण सर्वच नव्हे) मुलांना पूर्णपणे स्वतःच्या हिकमतीवर स्वतःच्या पायांवर उभे राहून बस्तान बसवावे लागत असावे. अनेकदा शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घरापासून दूर स्वतंत्रपणे राहावेही लागत असावे आणि जसजसे जमेल तसे हळूहळू घर, चीजवस्तू वगैरे संचय करत जावा लागत असावा. यात आईवडिलांकडून काही अंशी आर्थिक हातभार लागण्याची शक्यता असली तरी (विशेषतः नोकरीस लागल्यावर)  अनेकदा पूर्णपणे अशा हातभारावर अवलंबून राहण्याची इच्छा नसू शकावी, स्वबळावर बस्तान बसवण्याची, 'काहीतरी करून दाखवण्याची' उर्मी असू शकावी. यात नाही म्हटले तरी काही वर्षे जाऊ शकावीत आणि अनायासे आयुष्यात काही टक्केटोणपेही खाल्ले जाऊ शकावेत. या सर्व चीजवस्तू आयत्या मिळत नाहीत, त्यांकरिता कष्ट करावे लागतात याची अक्कल आलेली असावी, त्यातून अनेकदा त्या आयत्या मिळाल्या तरी नकोशा वाटू शकाव्यात. टक्केटोणपे खाल्ल्याने थोडी प्रगल्भता येत असावी.


बाविसाव्या किंवा तेविसाव्या वर्षी माणसाला (मुलांना काय किंवा मुलींना काय) कितीशी अक्कल आलेली असते? (मला नव्हती! म्हणजे आज चव्वेचाळिसाव्या वर्षीसुद्धा खूप आलेली आहे, असा दावा नाही. पण तेविसाव्या वर्षी तर नव्हतीच नव्हती.) जगाचा कितीसा अनुभव असतो? अगदी एकदोन वर्षे नोकरी केलेली असली तरी धक्के कितीसे खावे लागलेले असतात? मुलींच्या बाबतीत बोलायचे तर या वयात किती जणी खर्‍या अर्थी पूर्णपणे स्वतःच्या पायांवर उभ्या असतात, खर्‍या अर्थाने स्वतंत्र असतात? (आईवडिलांपासून दूर राहण्याची गोष्ट तूर्तास विसरून जाऊ. ते आवश्यक आहेच, अशातलाही भाग नाही.) त्यात 'या घरच्या लाडक्या लेकी'च्या आईवडिलांच्या घरी या चीजवस्तू असतील तर मग तर तशी अपेक्षा बनण्याची, तुलना होण्याची शक्यता वाढत असावी. मग भले त्या चीजवस्तू तिच्या स्वतःच्या कमाईच्या नसोत, आईवडिलांच्या कमाईच्या असोत. (स्वकमाईच्या असल्यास समजण्यासारखे आहे.) कदाचित अपेक्षा बनवण्यात काही अंशी आईवडिलांचाही अप्रत्यक्ष हातभार लागत असण्याची शक्यता नाकारता येऊ नये.

अनुभवातून आलेल्या शहाणपणाअभावी, जगात आपली नेमकी पत काय आहे याची नीट जाणीव झालेली नसताना, अपेक्षा या केवळ स्वत:बद्दलच्या कल्पनांखेरीज इतर कशातून निर्माण व्हायला फारसा वाव नसावा. अशा परिस्थितीत स्वतःबद्दलच्या कल्पना  या वास्तव असतील किंवा नाही हे बहुतांशी आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून राहावे. हे अर्थातच मुलांना आणि मुलींना सारखेच लागू व्हावे, आणि मुलांकडून अवाजवी अपेक्षा ऐकायला मिळाल्यास त्यामागेही बहुधा हेच कारण असावे. मात्र, मुलांच्या बाबतीत लग्नापूर्वी जगाचा अनुभव घेऊन आपली पत जाणण्याकरिता थोडासा अधिक वेळ मिळतो हीसुद्धा एक बाब आहेच. हा अधिकचा वेळसुद्धा सर्वच मुलांना शहाणपण येण्याकरिता पुरेसा असतोच, असे नाही, परंतु अनेकदा मुलींना तेवढाही वेळ उपलब्ध होत नाही, होऊ दिला जात नाही, हा कळीचा मुद्दा आहे.


आपण अत्यंत योग्य शब्दात हे मत मांडले आहे.