नाटकाच्या बाबतीत बहुतांशी लेखक आणि काही प्रमाणात दिग्दर्शक तर चित्रपटाच्या बाबतीत बहुतांशी दिग्दर्शक आणि काही प्रमाणात लेखक हे त्या त्या कलाकृतीचे सर्वेसर्वा असतात असे मला वाटते.
त्या नाटक वा चित्रपटात भाग घेणाऱ्या इतर (अभिनेते, गीतकार, संगीतकार, संवादलेखक, छायाचित्रकार, रंगभूषा/वेशभूषाकार इ. इ. ) कलावंतांना तयार होत असलेल्या कलाकृतींशी सुसंगत अशी कामगिरी ठेवण्याची आवश्यकता असते. त्यामुळे कलावंताच्या कामगिरीतील लवचिकता, (त्या त्या भूमिकेशी) अनुरूपता आणि विविधता ह्यांना सर्वात जास्त महत्त्व येते असे मला वाटते. प्रायोगिक (समांतर) नाट्य/चित्रपटांतल्या अनेक कलावंतांनी व्यावसायिक (गल्लेभरू? ) नाटक चित्रपटांतूनही तोडीस तोड कामगिरी करून ह्याची महती पटवलेली आहे. (उदा. शबाना आझमी, अमरीश पुरी, कुलभूषण खरबंदा, नाना पाटेकर इ. इ. )
मूळ कामगिरीतच अशी लवचिकता, अनुरूपता आणि विविधता आवश्यक असल्याने आस्वादकाने/चिकित्सकाने/समीक्षकानेही तशी लवचिकता अनुरूपता आणि विविधता आस्वादाचे/चिकित्से/समीक्षेच्या वेळी अंगी बाणणे महत्त्वाचे ठरते. अर्थात अधिकाधिक अभ्यासाने, परिश्रमाने आणि सरावाने ते जमेल असे वाटते.