हे इतके उलटसुलट प्रतिसाद बघून लग्न म्हणजे न सुटणारा प्रष्न आहे असं तरूणांना वाटू नये म्हणून लिहीतो आहे
१) लग्न हा मानवी जीवनातला अनिवार्य निर्णय आहे. तुम्हाला एकच ठरवावं लागतं लग्न करायचं किंवा नाही करायचं
२) एकदा करायचं म्हंटलं की एकच गोष्ट उरते आणि ती म्हणजे अश्या व्यक्तीचा शोध की जीच्या सहवासाचं आकर्षण फिटू म्हणता फिटणार नाही, म्हणजे प्रेम! तो सगळा बेहिशोबी कारभार आहे. तुम्हाला एखादी व्यक्ती क्लिक होते आणि तुमच्या जीवनाचा रंग बदलतो. तुम्ही ती व्यक्ती आहे तशी मंजूर करता आणि स्वतःच्या आयुष्यात सामील करून घेता. ती सुद्धा तुमच्या घरात एक होऊन जाते. जे काही आहे ते तुम्ही एकत्र भोगता आणि उपभोगता. अपेक्षा/अपेक्षाभंग असल्या फालतू गोष्टींना काही किंमत राहत नाही.
३) अपेक्षा हा प्रेमाची जादू न कळल्यामुळे माणसानी निर्माण केलेलेला पर्याय आहे. अश्या अपेक्षांनी केलेली लग्न फक्त बुद्धीबळाचे डाव होतात; त्यात दोघंही कोरडेच रहातात. मुली कितीही मिळवत्या होऊ द्यात आणि मुलं कितीही कर्तबगार होऊ द्यात प्रेमाला पर्याय नाही. प्रेमविवाह न टिकण्याचं एकमेव कारण सुद्धा प्रेम नसणं हेच आहे. तुमच्या अपेक्षांना दिलेलं प्रेम हे खोटं नांव आहे. प्रेमाचा अर्थ संपूर्ण पारदर्शकता आणि आहे ते आहे तसे वाटून घेऊन एकत्र जगणे असा आहे
४) तुम्हाला सगळ्याचं एकच उत्तर हवं असेल तर ते प्रेम आहे आणि प्रेम म्हणजे जवाबदारी आहे. तुम्ही प्रेमाची कारण मिमांसा करू शकत नाही आणि प्रेम हा सर्वस्वी तुमचा निर्णय असल्यामुळे तुम्ही तिथून माघार घेऊ शकत नाही, खरं तर माघार वगैरे गैर लागू ठरते. तुम्हाला एकच दिसतं की जीवन हा सहप्रवास आहे, आता फक्त पुढं जायचं आहे आणि हे हात कायमचे धरले आहेत
५) मी काही कल्पना चित्रं रंगवत नाही. माझा अनुभव तुम्हाला सांगीतला. येत्या डिसेंबरला आमच्या लग्नाला पंचवीस वर्ष होतील पण लज्जत अजूनही तशीच आहे.
संजय