असे वाटते आहे की, आता फार दिवस राहिले नाहीत. भारतातून एकत्र कुटुंबपद्धती  नामशेष होणार!  एकत्र कुटुंब पहायचे असेल तर इटली किंवा स्पेनलाच जावे लागेल.

भारतातून एकत्र कुटुंबपद्धती नामशेष झाल्यावर 'एकत्र कुटुंब' म्हणजे काय ते पाहण्याची एवढीच ज्याला जबरी इच्छा असेल, तो इटली किंवा स्पेनचे पर्यटन करायला कुरकुर करेल असे वाटत नाही.

किंवा तेवढा खर्च करण्याची ज्यांना इच्छा नसेल, त्यांच्यासाठी भारत सरकार एक योजना आखू शकेल. या योजनेअंतर्गत 'शोकेस व्हिलेजिस' (मराठी? ) बांधता येतील, ज्यांत खास पर्यटकांच्या सोयीसाठी 'एकत्र कुटुंबे' आपली जीवनपद्धती पर्यटकांसमोर जगून दाखवतील. अशा खास पर्यटकांसाठी 'मेड-टू-ऑर्डर' (मराठी?) एकत्र कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी सरकारकडून वेतन किंवा भत्ता देता येईल. शिवाय पर्यटकांकडून मिळणाऱ्या टिपाही त्यांच्याच खिशात जाण्याची मुभा ठेवता येईल.

माफ करा, पण 'कोणाचीतरी पाहण्याची इच्छा' या एकमेव कारणास्तव कालबाह्य होऊ घातलेली किंवा काळाची गरज न राहिलेली एखादी पद्धती टिकावी, नव्हे मुद्दाम टिकवावी, असे मला वाटत नाही. एकत्र कुटुंबपद्धती ही जेव्हा समाजाची गरज होती, तेव्हा ती कोणीही न टिकवता टिकली, आणि उद्याही ती जर समाजाची गरज राहिलेली असेल, तर कोणीही कितीही विरोध केला तरीही टिकेल, नसेल तर नामशेष होईल. त्यासाठी हळहळण्याचे काही कारण मला तरी दिसत नाही.

नातेवाइकांच्या विस्तृत गोतावळ्याला आणि त्यांच्यातील (किंवा पालक-पाल्यांतीलसुद्धा) जिव्हाळ्याच्या संबंधांना कोणाचाच काही प्रत्यवाय असण्याचे काही कारण नाही, मात्र त्यासाठी सर्वांनी (मारूनमुटकून?) एकाच छताखाली राहण्याचेही काही प्रयोजन आहे असे वाटत नाही. (उलटपक्षी असे एकाच छताखाली न राहिल्याने नातेवाइकांच्या विस्तृत -चुलत, मावस वगैरे - गोतावळ्यातील संबंध जर बनणार नसतील, तर याचा अर्थ गोतावळ्यातील व्यक्तींना अशा संबंधांची गरज नाही, असा घेता यावा. तेव्हा त्याबद्दल केवळ 'पूर्वीच्या काळी असे असायचे' म्हणून हळहळण्यात हशील नाही. )
 
अवांतर (दुसरी बाजू): 'एकत्र कुटुंबपद्धती' किंवा 'जॉइंट्ट फ्यामिली'च्या नावाखाली सुमारांचा सावळागोंधळ, एकमेकांच्या पाठीमागे एकमेकांच्या कुचाळक्या, नसत्यांच्या नसलेल्या गुणांची कौतुके, कुटुंबातील अनेकांच्या वैयक्तिक फायद्यासाठी कोणा एका त्यातल्या त्यात कर्तबगारावर त्याच्याही आयुष्याचा विचारसुद्धा न करता नसत्या जबाबदाऱ्या घेतोय म्हटल्यावर सोयिस्करपणे लादून (किंवा घेत नसला तरी गळ्यात मारून) त्याचा केलेला बळीचा बकरा, असा वैयक्तिक फायदा घेऊन फायदा घेणाऱ्यांनी मात्र आपला कार्यभाग साधल्यावर सोयिस्करपणे विभक्त होणे, बळीच्या बकऱ्याने इतरांपायी स्वतःच स्वतःच्या आयुष्याची लावून घेतलेली वाट आणि त्याचे इतरांकडून एक तर "अपरिहार्यता" म्हणून समर्थन किंवा "कुटुंबासाठी त्याग" म्हणून फुकाचा गौरव, कौटुंबिक राजकारण, ज्याच्यात्याच्या वैयक्तिक आणि अत्यंत खाजगी स्वरूपाच्या निर्णयांतसुद्धा नसत्यांची लुडबूड आणि सार्वमताने निर्णयप्रक्रिया, आणि एकंदरीतच ज्याचीत्याची ज्यातत्यात नाके आणि एकमेकांच्या तंगड्यात तंगड्या ही दुसरी बाजूसुद्धा बऱ्यापैकी जवळून पाहिलेली असल्याने 'जॉइंट्ट फ्यामिली' या प्रकाराचे फारसे कौतुक किंवा आकर्षण नाही. किंबहुना 'एकत्र कुटुंबपद्धती' किंवा 'हिंदू अविभक्त कुटुंब' हे हिंदू समाजाचे 'ओरिजिनल सिन' आहे, आणि ज्या दिवशी ही पद्धत नामशेष होईल तो सुदिन, अशी काहीशी भावना झालेली आहे. शेवटी 'एकत्र कुटुंब' हा एक जमाव (किंवा झुंड) आहे, आणि जमावाचे (किंवा झुंडशाहीचे) मानसशास्त्र येथेही पूर्णपणे लागू होऊ शकते, ही गोष्टही लक्षात घेणे आवश्यक आहे, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)