_मी व माझ्या वाग्दत्त वधूने वर्षभरापूर्वी एकमेकांशी चॅट व फोन कॉल्स च्या माध्यमातून गप्पा मारण्यास सुरुवात केली. आमची ओळख आमच्या पालकांनीच करून दिली होती. गप्पाष्टकानंतर तीन महिन्यांनी साखरपुडा नि १० महिन्यांनी लग्न असा जवळजवळ वर्षभराचा हा प्रवास आहे. हा प्रवास "ठरवून केलेले लग्न" या प्रकारात मोडत असला तरी एकमेकांविषयीचे प्रेम नि आदरभाव यांबाबत आमच्या दोघांच्याही मनात तिळमात्र शंका नाही. कारण या दोन गोष्टींच्या जोरावर आम्ही दोघांनी लग्न व्हायच्या आधी एकत्रितपणे जे निर्णय घेतले आहेत, जे ढोबळ बेत आखून राबवले आहेत, ज्या वैयक्तिक स्वप्नांवर केवळ दुसऱ्यावरील प्रेमापोटी पाणी सोडले आहे, ते याबद्दलचा पुरावा म्हणून पुरेसे आहे. यांपैकी जे निर्णय/बेत एकमेकांची ऐहिक प्रगती, करिअर, जीवनशैली इ. बद्दलचे होते त्यांना मी तरी व्यवहारी वागणे/निर्णय समजतो. आणि या एकाही निर्णयात दोघांच्याही पालकांनी काडीचाही हस्तक्षेप केलेला नाही, हे विशेष. किंबहुना एकमेकांशी औपचारीक ओळख करून देण्यापलीकडे आमच्या पालकांनी आम्ही एकमेकांना होकार देईपर्यंत काही केले नाही (होकारानंतर साखरपुड्याची तयारी, खरेदी, लग्नाची तयारी नि खरेदी वगैरे मात्र केले
)
साखरपुड्याच्या वेळी नि आताही जेव्हा परिचितांकडून नि आप्तेष्टांकडून "काय मग? किती वर्षे (अफेअर/लफडे) चालू होते तुमचे? " अशी विचारणा झाली/होते त्यावेळी आमचे लग्न आमच्या पालकांनी नाही तर आम्हीच ठरवले आहे, याचा आनंद नि समाधान लाभते; स्व-कौतुकमिश्रित हसूही येते.
जे आमच्या बाबतीत झाले, तेच इतरांच्या बाबतीत होत असेल असे नाही. मात्र मला स्वतःला जो अनुभव आला, त्यावरून ठरवून केलेल्या लग्नात मुलामुलींना एकमेकांविषयी जिव्हाळा नि आदरभाव नसतो, त्यात शुद्ध व्यवहार असतो वगैरे तुमची मते मला अत्यंत टोकाची नि एकांगी वाटतात. असे प्रेम नि आदरभाव लग्न ठरताना निर्माण होतो की साखरपुड्यानंतर की प्रत्यक्ष लग्नानंतर (आणि होतो की होत नाही), याबद्दलचे मुलामुलींचे अनुभव भिन्न असतील. मात्र असे असतानाच प्रेमविवाहांमध्येही केवळ प्रेम नि आदर या दोनच गोष्टींचा विचार केला जातो, असे बिलकुल वाटत नाही. यशस्वी सहजीवन व वैवाहिक आयुष्यासाठी जितका व्यवहारी विचार केला जायला हवा, तो यशस्वी प्रेमवीर नक्कीच करतात, असे वाटते. शाळेतल्या माझ्या सर्वात आवडत्या शिक्षिका जेव्हा "हे लग्न, संसार सगळे एक परस्परसंमतीने केलेले राजकारण असते" असे म्हणतात नि ते तार्किकदृष्ट्या पटवून देतात, तेव्हा तर त्याची खात्रीच वाटते. त्यामुळे आवश्यक तेव्हढा व्यवहारी विचार केल्याशिवाय लग्न करण्याइतके कोणी दुधखुळे नसते, असे वाटते. आणि असलेच तर अशा विवाहांची परिणती काय होते, हेही सर्वश्रुत आहेच. असो.
त्यामुळे तुम्ही म्हणत असलेला 'व्यवहार' हा मुलामुलींनी परस्परसंमतीने, एकमेकांवरील प्रेम नि आदर यांच्याशी प्रामाणिक राहून केला असेल, तर बिघडले कुठे? तुमचा आक्षेप हा लग्न ठरवताना केला जाणाऱ्या व्यवहारी विचारावर आहे की तो व्यवहारी विचार कुणी करायचा (मुलामुलींनी करणे की त्यांच्या पालकांनी की इतर कुणी) यावर आहे, हे तुम्ही स्पष्ट करावे, असे सुचवावेसे वाटते.