ठरवून लग्न हा प्रकार म्हण्जे निव्वळ व्यवहार आहे.
हे पूर्णपणे मान्य आहे. मला परिचित असलेल्या समाजजीवनात ठरवून लग्न ठरवण्याची दुसरी पद्धत मला माहीत नाही. दोन्ही बाजू यात व्यवहार बघणार हे ओघानेच आले. विवाहमेळाव्यासारख्या प्रकाराशी आपण परिचित असलात तर तिथे मुलांचा समूहाला परिचय करवून देण्यासाठीची क्रमवारी ही शिक्षण व त्यापेक्षाही मासिक/वार्षिक उत्पन्न यानुसार केली जाते. (मागील एक दोन वर्षांपर्यंत एन आर आय मुलांना आधी प्राधान्य दिले जायचे. रिसेशन नंतर त्यांनाही देशी मुलांमध्येच समाविष्ट केले जाते.) म्हणजे मासिक १००००० रु. पगार असलेल्या मुलाचा परिचय हा मासिक ९०००० रु. पगार असलेल्या मुलाच्या आधी करवून दिला जातो. जेणे करुन वधूपित्यांना व प्रामुख्याने वधूंना अधिक उत्पन्नाची मुले प्रथम पाहावयास मिळावीत व त्यातून त्यांची निवड केली जावी. अशा वेळी मुलाची भावना संमिश्र असू शकते. (त्याची स्वतःची विचारक्षमता, प्रगल्भता व संस्कार यावर त्याचा समज हा आपण स्वतः पैसे छापण्याचे मशीन आहोत की काय असा होऊ शकतो किंवा या यादीत प्रथम क्रमांक आल्याने गर्वाने त्याची छाती फुगू शकते. त्यामुळे मुलीची निवड करतानाचा त्याचा विचार साईनफेल्डमधील जॉर्ज कुस्टान्झाप्रमाणे, मी जर या मुलीच्या रंगरंगोटीसाठी, कपड्यांसाठी पैसे खर्च करणार असेल, तर लेट मी गेट माय मनी'ज़ वर्थ. आय एम पेईंग फॉर दोज थिंग्ज़', असा होऊ शकतो. साहजिकच जिथे हे पैसे खर्च होणार ती मुलगी रंगरुपाने बरी असावी जेणेकरुन सौंदर्यप्रसाधनांसाठीचा खर्च वाया जाणार नाही अशी त्याची मनोभूमिका होऊ शकते.) [अवांतरः माझे वैयक्तिक मत, जी मुलगी दिसायला आधीच बरी असते तिच्यावर केलेला सौंदर्यप्रसाधनांचा खर्च वायाच जातो, कारण सौंदर्यप्रसाधनांच्या वापरापूर्वी व वापरानंतर फारसा फरक दिसत नाही, असे आहे, त्यामुळे मुलांच्या अशा मनोभूमिकेशी मी असहमत आहे.]
मुलींची मनोभूमिका नक्की कशी असते हे मी मुलगी नसल्याने मला माहीत नाही. मात्र मी ऐकलेल्या अपेक्षांनुसार तिची मनोभूमिका ही आपला नवरा दिसायला चांगला, बांधेसूद, पोट न सुटलेला, डोक्यावर भरपूर काळेभोर केस असणारा, कर्तृत्ववान, उत्तम पगाराची नोकरी व पुण्यात (वयाच्या २५-२७ व्या वर्षीच) स्वतःचे २-३ बेडरुमचे घर असलेला, घरात शक्य तितक्या इलेक्ट्रॉनिक सुखसोयी असणारा असावा अशी असते.
खरेतर लग्नासारखा
निर्णय घेताना एकमेकावर मनापसून प्रेम असणे , एकमेकांविषयी आदर असणे या
गोष्टी अत्यावश्यक आहेत. परंतु ठरवून लग्न करताना असे प्रेम उत्पन्न होणे
बहुतेकदा शक्य नसते. तेव्हा दोन्ही बाजू केवळ व्यवहार बघताना आढळतात.
अमेरिकेसारख्या देशांमध्ये लग्ने ठरवण्याच्या डेटिंगसारख्या पद्धतींमध्ये लग्न ठरवण्यापूर्वी मुलामुलींचा अनेक वर्षे परिचय होतो. (तिथे लग्नाची याव्यतिरिक्त वेगळी कोणती पद्धत आहे याची मला कल्पना नाही.) लग्नापूर्वी दोघांचे एकमेकांवर अत्यंत प्रेम असते. एकमेकांविषयी आदर असतो. बहुदा इथे व्यवहार पाहिला जात नसावा. मात्र अशी केलेली लग्ने किती वर्षे टिकतात. वर्तमानपत्रातील बातम्या व आकडेवारींनुसार अमेरिकेतील घटस्फोटांचा दर ३० टक्के ते ५० टक्क्याच्या आसपास आहे. म्हणजे लग्नासारखा निर्णय घेताना एकमेकांवर असलेले प्रेम, आदर व व्यवहाराचा अभाव या गोष्टी विवाहाच्या यशस्वितेसाठी उपयुक्त ठरतात का हे पाहावे.
आज्पर्यंत इतकी वर्षे मुलींची बाजू पडती , कमी पणाची समजली गेल्याने
मुलाकडचे जास्तीत जास्त अपेक्षा ठेवून , आप्ला होईल तेव्हढा व्यावहारीक
फायदा करून घेताना दिसायचे. आता एका वर्गात मुलीदेखिल सक्षम जाल्याने आता
मुली कडचे देखिल आप्ला होईल तेव्हढा फायदा करून घ्यायला बघतात.
स्वतःचा फायदा पाहून घेणे हे सर्वच जण करतात. मात्र मुलीने ठेवलेल्या अपेक्षा व त्या मुलीची पत/लायकी यांचा मेळ जुळवण्याचे काम मुलीच्या पालकांचे व नातेवाईकांचे असते. जे करण्यात ते कमी पडत आहेत अशी एक साधारण भूमिका प्रतिसादांमधून दिसली.